खड्डे बुजवा अन्यथा गणेश विसर्जन मिरवणूक नाही, कार्यकर्त्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:15 PM2019-09-03T12:15:44+5:302019-09-03T12:16:37+5:30
नशिराबादला शांतता समितीच्या बैठकीत इशारा
नशिराबाद, जि. जळगाव : गावातील प्रमुख रस्त्यांची पुरती वाट लागली असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. खड्डेयुक्त रस्त्यातून बाप्पाचे आगमन होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. हे सर्व खड्डे तात्काळ बुजवा, दुरुस्ती करा अन्यथा श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला. लवकरच खड्डे बुजवणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने यावेळी दिली.
नशिराबाद पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील, भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड, उपसरपंच कीर्तीकांत चौबे, गणपत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण साळुंखे उपस्थित होते.
गावातील खड्डेयुक्त रस्त्यांमुळे झालेली चाळण, त्यामुळे येणाऱ्या अडचणी याविषयी कार्यकर्त्यांनी समस्या मांडल्या. माजी सरपंच पंकज महाजन, असलम तन्वीर, मुकुंदा रोटे, राजेंद्र रोटे, रवींद्र पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे आदींनी मनोगत व्यक्त केले. सण उत्सव साजरे करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. सलोखा अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी केले.
रस्त्यावर नुसता खच टाकू नका, दर्जेदार दुरुस्ती करा, डांबराने खड्डे बुजवा. ग्रामपंचायतीकडे डांबर नसेल तर उपलब्ध करून देवू, असे मुकुंदा रोटे यांनी सांगितले. खड्डेयुक्त रस्त्यांची दुरुस्ती लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसरपंच चौबे यांनी सभेत दिली. सभेला जनार्दन माळी, योगेश पाटील, विनोद रंधे, विनायक धर्माधिकारी, दगडू माळी, सुरेंद्र जैन ,बरकत अली, चंदन पाटील, ललित बराटे, अरुण भोई, किरण पाटील, दिगंबर पाटील, वीज मंडळ सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे, डॉ. प्रमोद आमोदकर उपस्थित होते. बी. आर. खंडारे यांनी सूत्रसंचालन केले.
वीज गुल अन् पावसाचा व्यत्यय
आधीच सव्वा तास उशिराने सुरू झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे काही वेळ व्यत्यय आला. त्यातच पाऊस आल्यामुळे भर पडली. पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या देशी दारूच्या दुकानातून मद्यपींचा होणारा गोंधळ थांबवावा, अशी सूचनाही यावेळी सभेत करण्यात आली. गावातील समस्या ग्रामसभेत मांडव्यात, त्या शांतता समितीत नको, असा उल्लेख होताच, ही शांतता समितीची बैठक की मुशायरा अशी कोपरखळीसुद्धा काही मिनिटे रंगली.