खान्देशात अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; कोल्हापूरसारखी स्थिती ओढावण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:59 AM2019-08-10T03:59:59+5:302019-08-10T04:00:10+5:30
१४ तालुक्यांत अतिवृष्टी, ३ जण ठार, दोघे बेपत्ता
जळगाव : पावसाने खान्देशाकडे मोर्चा वळविला असून, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांना चांगलेच झोडपले आहे. २५ पैकी १४ तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, नदीनाल्यांना पूर आला आहे. या थैमानात एकूण ३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांना जलसमाधी मिळाली, तर एका महिलेचा भिंत पडून मृत्यू झाला, अन्य दोघे पुरात बेपत्ता झाले आहेत.
शिरपूर तालुक्यात फत्तेपूर फॉरेस्ट येथील मातीचे धरण (बंधारा) फुटल्याने त्यातील पाणी वाहून गेले. नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर या सर्व ६ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातही सर्व चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली, तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, यावल, अमळनेर, चोपडा या ४ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली. अमळनेर तालुक्यात तीन गावांमध्ये पुुलामुळे धोका निर्माण झाला आहे. अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले असून, कळमसरे गावास पाण्याचा वेढा पडला आहे.
राज्यासाठी अंदाज
१० ऑगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाने विशेषत: धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तर हाहाकार माजविला आहे. तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, कान आदी नद्यांना महापूर आला आहे.