नाटक सादर करताना अडीअडचणींवर मात करण्याची उर्मी स्पर्धेतून मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:08 PM2017-11-22T13:08:15+5:302017-11-22T13:12:01+5:30
सूर : परिवर्तन संस्थेच्यावतीने ‘राज्य नाटय़ स्पर्धेने आपल्याला काय दिले?’वर परिसंवाद
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 22 - नाटक सादर करताना तालीमसाठी जागा नसणे, साधन नसणे, योग्य वातावरण नसणे, संहीता नसणे तसेच पैशाची जुळवाजुळव करावी लागते, अशा अनेक अडचणी दिग्दर्शक, कलावंतांसमोर असतात. या सर्वामध्ये नाटक सादर करायची उमेद व उर्मी मात्र असते. त्यामुळेच सर्व अडीअडचणींवर मात करीतही नाटकाचे सादरीकरण करणे, नाटक होणे हेच अधिक महत्त्वाचे असून या अडचणींनी सोडवणूक प्रत्येक कलावंत कशी करतो व आधुनिक काळातही उर्मी मिळवितो, असा सूर मंगळवारी परिवर्तन संस्थेच्यावतीने आयोजित ‘राज्य नाटय़ स्पर्धेने आपल्याला काय दिले?’ या परिसंवादामधून उमटला.
नाटय़कलावंत राज्य नाटय़ स्पर्धा झाल्यानंतर एरव्ही इकडे तिकडे निघून जातात. मात्र मंगळवारी परिवर्तन संस्थेच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करून सर्वाना एकाच व्यासपीठावर आणले. परीवर्तन संस्था यंदा राज्य नाटय़ स्पर्धेत सहभागी नसल्याने त्यांनी रंगकर्मीनी आपल्या भावना, मत व्यक्त करावे यासाठी नूतन मराठा महाविद्यालयात हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यामध्ये स्पर्धा संपली की नाटक संपते. नाटकाचे प्रयोग होत नाही, नाटकवाल्यांमध्ये त्याबद्दलची देवाणघेवाण होत नाही, दिग्दर्शकांशी अनेकदा कलावंतांचाही संवाद होत नाही. यामुळे नाटकाचे मूल्यमापन करायला अनेकदा कमी पडतो. त्यामुळे शहरातील नाटक हे एका विशिष्ट मर्यादेपुरताच अडकते आणि ते पुढे जात नाही. यावर विचार व्हावा या उद्देशानेच हा परिसंवाद घेण्यात आल्याचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी सांगितले.
व्यासपीठावर मंजुषा भिडे, प्रा.डॉ. शमा सुबोध, पियूष रावळ, चिंतामण पाटील, विनोद ढगे यांची उपस्थिती होती. मान्यवरांसह स्पर्धेतील प्रत्येक दिग्दर्शकाचा स्मृतीचिन्ह व ‘लोकमत’चा दीपोत्सव अंक देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये रमेश भोळे, अनिल कोष्टी, विशाल जाधव, किरण अडकमोल, प्रदीप भोई, आकाश बाविस्कर, चिंतामण पाटील यांचा समावेश होता. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.
नाटकाचे विविध प्रकार, आधुनिक काळात बदलेले नाटक, रंगमंचाचा शक्यतांचा घेतलेला शोध व यातुन नविन करण्याची मिळालेली उर्मी या सर्वांचा उहापोह यामध्ये प्रत्येक कलावंतांनी केला. प्रत्येक नाटकांविषयी दिग्दर्शक, वक्ते व उपस्थित कलावंतांनी मते मांडली.
सगळ्या कलांना सोबत घ्यावे
यावेळी चिंतामण पाटील म्हणाले की नाटकात काय करावे? आणि काय करु नये हे आम्हाला नाटक पाहून कळाले. अनेकदा संगीताची जोड नाटकाला देणे खूप कठीण असते. मात्र नाटय़कर्मीनी सगळ्यांची साथ, सगळ्या कलांना सोबत घ्यावे. नृत्य, संगीत, शिल्प अशा सगळ्या कलांमध्ये गेल्यास नाटक व कलावंत म्हणून आपण अधिक प्रगल्भ होत असतो असे नमूद केले. मिलींद पाटील यांनी प्रेक्षकांच्या भूमिकेतून मत मांडताना सांगितले की समाजाला आपण काय देतो? यातून लेखन व्हावे. सकारात्मकतेच्या बाबींचा विचार करून त्यापद्धतीने प्रेक्षकांना चांगला विचार देणारे नाटक सादर व्हायला हवे. तर प्रविण पांडे यांनी राज्य नाटय़ाला आपण काय द्यायला हवे याचाही विचार हवा. कलावंत म्हणून नाटय़ स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी आपण काय करतो आहे याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.