नेत्र कक्ष लवकरच पुर्ववत सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:01+5:302021-01-08T04:49:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड सुविधा सुरू झाल्या असून नेत्रतपासणी सुरू आहेत, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड सुविधा सुरू झाल्या असून नेत्रतपासणी सुरू आहेत, मात्र, यात ३५ रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या असल्याने आता नेत्र कक्ष पुर्ववत सुरू करण्यात येणार आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशीही चर्चा केली आहे.
सर्व सुविधा सुरू झालेल्या असल्या तरी काही कक्ष हे कोविडसाठी असल्याने काही आजारांसाठी अद्याप पूर्ण सेवा उपलब्ध नव्हता मात्र, आता टप्प्याटप्याने सर्व सुविधा सुरू करण्यावर भर असल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले. नेत्रकक्षात अगदी सुरूवातीपासून कोविडचे रुग्ण दाखल करण्यात येत आहेत. शिवाय या ठिकाणी शस्त्रक्रिया विभागही असल्याने किमान सात दिवसात तो सॅनेटायझ करावा लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. आता ३५ रुग्णांना डोळ्याची शस्त्रक्रीया आवश्यक असून यांची यादी काढण्यात आली असून हे रुग्ण आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कोविडमध्ये फेरबदल
कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने अडचणी नको म्हणून सी ३ कक्ष हा संशयित तर सी २ कक्ष हा बाधित रुग्णांसाठी ठेवण्यात आला आहे. आधि सी २ कक्षात संशयित रुग्णांना दाखल केले जात होते. या कक्षाची क्षमता अधिक असल्याने हा बदल करण्यात आला आहे. संशयित रुग्णांना आता सी ३ कक्षामध्ये दाखल केले जात आहे.