डोळ्यांच्या शस्त्रक्रिया रखडल्या, हजारो ज्येष्ठांसमोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:32+5:302021-05-12T04:16:32+5:30
कोविडमुळे रुग्णालयांमध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंदच, दृष्टी कमी होण्याचा धोका लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षी मार्चपासून शासकीय वैद्यकीय ...
कोविडमुळे रुग्णालयांमध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंदच, दृष्टी कमी होण्याचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षी मार्चपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे. तेव्हापासून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. आताही जिल्ह्यातील जवळपास ४ ते ५ हजार ज्येष्ठ नागरिक हे या समस्येला तोंड देत आहेत.
डोळ्यात मोतीबिंदू आहे; मात्र शस्त्रक्रिया करायची तरी कुठे, हा प्रश्न या ज्येष्ठांना पडला आहे. कोविडचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता आरोग्य यंत्रणा देखील हतबल झाली आहे.
साधारणत: नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पहिली लाट ओसरायला सुरुवात झाली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जानेवारीमध्ये नॉनकोविड घोषित करण्यात आले. एक महिनाभरात जवळपास १५० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते. या दोन शासकीय रुग्णालयांत डेडिकेटेड आयओटी, ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आहे, तर सर्व ग्रामीण रुग्णालये आणि ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेत्रचिकित्सा अधिकारी यांची पदे मंजूर आहेत. तेथे रुग्णांची तपासणी करून त्यांची यादी केली जाते. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया ज्या रुग्णालयात करायची आहे तेथे आणले जाते.
त्यांची शस्त्रक्रिया करून तीन दिवस देखरेखीखाली ठेवले जाते. सध्या काही शस्त्रक्रिया या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात देखील केल्या जात आहेत.
तेथे कोविड आणि नॉनकोविड अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्याला गेल्या वर्षी ५५०० चे उद्दिष्ट देण्यात आले होते, अशी माहिती डॉ. यु. बी. तासखेडकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे
नेत्रशस्त्रक्रिया रखडल्या आहेत. या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा जिल्ह्यातील चोपडा रुग्णालय आणि जळगाव जिल्हा रुग्णालयात आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर मिळालेल्या एक महिन्याच्या कालावधीत जवळपास १५० शस्त्रक्रिया पार पडल्या.
- डॉ. यु. बी. तासखेडकर, प्रशासन अधिकारी,
जिल्हा सामान्य रुग्णालय.
काय आहेत दुष्परिणाम
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया वेळेत झाली नाही तर त्याचे काचबिंदूत रूपांतर होते आणि त्यानंतर काचबिंदूची शस्त्रक्रिया केली तर रुग्णाची दृष्टी कमी होण्याचा धोका असतो. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही शस्त्रक्रिया बंद आहे.
- डॉ. प्रसन्न पाटील, सहयोगी प्राध्यापक, नेत्ररोग विभाग, जीएमसी
गेल्या वर्षीचे जिल्ह्याला मिळालेले नेत्ररोग शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट - ५५००
जानेवारीत करण्यात आलेल्या नेत्ररोग शस्त्रक्रिया - १५०