मुलाच्या डोळ्यादेखत पिता वाहिला तापीच्या पुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:38 AM2019-08-01T11:38:23+5:302019-08-01T11:39:38+5:30
कठोरा येथील घटना : दोन दिवसापासून सुरु आहे शोध
जळगाव : तापी नदीच्या काठी म्हशी चारत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने धोका नको म्हणून तेथून उठतानाच तोल गेल्याने बाळू बलदेव सपकाळे (४८) हे पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कठोरा, ता.जळगाव येथे घडली. दरम्यान, सपकाळे यांचा दोन दिवसापासून शोध सुरु असून ते अद्यापही हाती लागलेले नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू सपकाळे व मुलगा हर्षल (१७) असे दोघं जण मंगळवारी तापी नदीच्या काठावर म्हशी चारत होते.
शेजारीच बकऱ्या चारणारे मुले असल्याने हर्षल त्यांच्याशी गप्पा मारत होता. तर वडील नदीकाठी बसलेले होते.
हतनुर धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला.
त्यामुळे धोका नको म्हणून बाळू सपकाळे तेथून उठायला लागले असता त्याचवेळी तोल गेल्याने ते पाण्यात कोसळले व क्षणातच वाहून गेले. हा प्रकार मुलाने पाहताच आरडाओरड केली.
परिवाराचा प्रचंड आक्रोश
सपकाळे पुरात वाहून गेल्याने परिवाराने प्रचंड आक्रोश केला. पत्नी मंगला यांची प्रकृती बिघडली आहे. सपकाळे यांच्याकडे अल्प शेती आहे. शेती व म्हशींच्या दुधावर त्यांचा उदरनिर्वाह असायचा. त्यांना दोन मुली असून एक विवाहित आहे. मुलगा हर्षल व लहान मुलीचे लग्न झालेले नाही.
एक भाऊ भगवान जळगाव येथे तर विजेंद्र व बापू हे दोन भाऊ गावातच वास्तव्याला आहेत.दरम्यान, सपकाळे तापी नदी काठावरील गावाजवळ आढळून आल्यास कळवावे,अशी विनंती कठोरा येथील गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, तलाठी किरण सपकाळे यांनी बुधवारी गावात येवून माहिती घेतली.
भोकरपर्यंत घेतला शोध
सपकाळे पुरात वाहिल्याने गावातील लोकांनी नदीपात्रात शोध घेतला. त्यानंतर सावखेडा येथील पट्टीच्या पोहणाºयांना पाचारण करण्यात आले.रबरी ट्युबच्या सहाय्याने पोहणाºयांनी सपकाळे यांचा भादली व भोकरपर्यंत शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. पोलिसांनीही घटनास्थळी भेट देवून पुढे ज्या गावातून नदीचे पात्र गेले आहे, तेथील गावकºयांना माहिती कळविली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.तापी नदीच्या वाढत्या पुरामुळे शोध घेताना अनेक अडचणी येत आहेत.