फडणवीस खडसेंच्या कोथळीत, तर खडसे मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 09:45 PM2021-06-01T21:45:15+5:302021-06-01T21:45:37+5:30

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Fadnavis in Khadse's Kothali, while Khadse in Mumbai | फडणवीस खडसेंच्या कोथळीत, तर खडसे मुंबईत

फडणवीस खडसेंच्या कोथळीत, तर खडसे मुंबईत

Next


मुक्ताईनगर (जि. जळगाव)  : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला गतिरोधक ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन येथे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. तिकडे खडसे मात्र सोमवारी मुंबई येथे पोहोचले आहेत. 
जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता फडणवीस दौऱ्यावर आले असता  मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोहोचले. त्यांच्यासोबत गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती आदी उपस्थित होते. सुमारे २० मिनिटे फडणवीस हे मुक्ताई सदनात थांबले होते. फडणवीस व खडसी यांच्यात ते एकाच पक्षात असतानाही पटले नाही. तर  खडसे  यांनी त्यांच्यामुळेच भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, असे सांगितले गेले आहे. अशात फडणवीस हे खडसे यांच्या निवासस्थानी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, खासदार रक्षा खडसे या भाजपच्या असून त्यांनी चहापानाचे निमंत्रण दिले. त्यामुळे आपण तेथे गेलो होतो. यात इतर कुठलेही कारण नव्हते. असे फडणवीस यांनी रावेर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 
पॉईंटर..
मुक्ताईनगर येथे शिवसैनिकांनी फडणवीस यांचा ताफा अडवत केळी पीक विम्याबाबत केंद्राच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करीत पूर्वीची योजनाच अंमलात आणावी, अशी मागणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या अशी मागणी फडणवीस यांनी मुक्ताईनगर तालुक्यात केली तर मुख्यमंत्री  यांनी गतकाळी सत्तेत नसताना केलेल्या मागणीप्रमाणे शेतकर्‍यांना भरीव मदत करावी असा प्रतिहल्लाही त्यांनी रावेर येथे पत्रपरिषदेत चढवला.

फडणवीस यांच्या दौऱ्याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक पदाधिकारी अनुपस्थित होते. मुक्ताईनगर नगर पंचायतीचे आठपैकी केवळ नगराध्यक्ष नजमा तडवी आणि ललित महाजनवगळता एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर
शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुक्ताईनगर येथील पाहणी दौऱ्यात एका तरुण शेतकऱ्याने ताफ्यातील वाहने अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथे मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची फडणवीस यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार घडला. मंगळवारी दुपारी फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा या शेतकऱ्याच्या शेताकडून जात होता. त्याचवेळी योगेश याने ताफा अडवून फडणवीस यांना आपल्या शेतात येऊन पाहणी करावी, अशी विनंती केली. मात्र, त्यांनी टाळल्याने आपला दौरा फोटो सेशनसाठी असल्याचा आरोप त्याने केला. यावेळी योगेश याने सोबत विषाचा डबा आणला होता. तो पोलिसांनी जप्त केला. यानंतर फडणवीस यांच्या वाहनाचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.

Web Title: Fadnavis in Khadse's Kothali, while Khadse in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.