रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:31 PM2020-08-06T13:31:08+5:302020-08-06T13:31:21+5:30

जळगाव : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’कडे म्हणजेच त्यांच्या संपर्कात आलेल्या ...

Failure to locate citizens in contact with patients | रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात अपयश

रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात अपयश

googlenewsNext

जळगाव : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’कडे म्हणजेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात प्रशासन हतबल ठरत असल्याचे चित्र जळगावात पहायला मिळत आहे. अनेक रुग्णांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या नागरिकांबाबत साधी विचारणाही केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कात असलेल्या नातेवाईक वा मित्रपरिवार तसेच कार्यालयीन सहकारी यांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी पूर्वी केली जात होती. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेही व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे.
प्रशासन एकीकडे वाढती गर्दी, नागरिकांचा बेफिकीरपणा आदी सबब सांगून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नागरिकांना जबाबदार धरत असले तरीही प्रशासनही अनेक पातळीवर अपयशी ठरत असल्याचेच यामुळे दिसून येत आहे. रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याला त्याच्या घरचा पत्ता, त्याच्या संपर्कातील नातेवाईक, मित्र तसेच अन्य नागरिकांची यादी करवून घेणे गरजेचे असताना ती व्यवस्थित केली जात नसल्याचे चित्र आहे. या रुग्णांवर केवळ उपचारापुरतेच लक्ष दिले जात आहे किंवा त्यांच्या कुटुंबियांची वा शेजाऱ्यांची थर्मल तपासणी केली जाते. यापलिकडे त्यांचा स्वॅब घेणे, आदी नियमांची कार्यवाही होतच नसल्याचे गंभीर चित्र जळगावात दिसत असून काही जागरूक नागरिक मात्र स्वत:हून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतीगृहात रॅपिड अ‍ॅण्टीजन टेस्टसाठी जातात. जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचार घेत असतात, त्या वॉर्डमध्ये नातेवाईक फिरत असतात.

समिती आली, गेली..पुढे काय?
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय समितीने जळगावचा दौरा केला, तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील काही नातेवाईकांना रुग्णाची स्थिती, उपचारपध्दती, सेवा याबाबत दूरध्वनीव्दारे विचारणा करण्यात आली होती. यावेळी अनेक रुग्णांनी सेवेतील त्रुटी सांगितल्या होत्या. मात्र अजूनही त्यात काही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांबाबतीत राहणाºया त्रुटी
- रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांचे हायरिस्क, लो रिस्क वर्गीकरण करून त्यांचा स्वॅब घेणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही.
-जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर केसपेपरवर आधारकार्डचाच पत्ता ग्राह्य मानला जातो. अनेकवेळा रुग्णाचा आधारकार्डवरील पत्ता एक तर सध्याचा वास्तव्याचा पत्ता दुसरा असतो. अशावेळी रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर संबंधित घर सील करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आदीकडे लक्षच पुरवले जात नाही. केवळ रुग्णांवर उपचार करण्यापुरतेच आरोग्य यंत्रणा कार्यवाही करते.
-सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना भेटण्यासही दिले जात नाही तर दुसरीकडे गंभीर रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना खुलेआम प्रवेश दिला जातो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचीच शक्यता जास्त राहते.

कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांची यादी बनवण्याचे काम नेमून दिलेल्या कर्मचाºयांकडे सोपवण्यात आले आहे आणि ही यंत्रणा शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कार्यरत आहे. संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे, त्यांचा स्वॅब घेणे, उपचाराकडे लक्ष देणे आदी कामे या यंत्रणेमार्फत केली जातात. यासाठी नेमके किती कर्मचारी नियुक्त करण्यात आले, हे लगेचच सांगता येणार नाही. परंतु, ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळतो, त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागाची ही यंत्रणा पोहोचतेच.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

Web Title: Failure to locate citizens in contact with patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.