कोरोना लसीकरणासाठी केंद्रांवर जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:03+5:302021-05-07T04:17:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लसीचे ६८ हजार डोस प्राप्त होताच गुरुवारी सकाळपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळली ...

Fair at centers for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी केंद्रांवर जत्रा

कोरोना लसीकरणासाठी केंद्रांवर जत्रा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लसीचे ६८ हजार डोस प्राप्त होताच गुरुवारी सकाळपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळली होती. यात विषेशत: रेडक्रॉस रक्तपेढीच्या केंद्राला यात्रेचे स्वरूप आले होते. रेडक्रॉस रक्तपेढीपासून ते थेट बीजे मार्केटच्या दुसऱ्या टाेकापर्यंत रांग लागलेली होती. दुपारी ११ वाजेपर्यंत या केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. दुपारी काही वेळ कर्मचारी व ज्येष्ठांमध्ये मोठा वादही झाला होता.

गेल्या सहा दिवसांपासून शहरातील केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळत नसल्याने त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण वाढून हा डोस लवकर मिळावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धडपड सुरू आहे. यात काही केंद्रांवर तर हे ज्येष्ठ नागरिक पहाटे सहा वाजेपासून रांगेत उभे राहत आहेत. तसाच काहीसा प्रकार गुरूवारी पहाटे घडला.

१) गुरूवारी अगदी पहाटेपासून रेडक्रॉसच्या केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली होती. नागरिकांचा नंबर लागत नसल्याने या ठिकाणी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले हेाते. नागरिक अगदी ओरडून ओरडून विचारणा करीत होते. मात्र, मार्गदर्शन करणारी यंत्रणा पुरेशी नसल्याने गर्दी वाढतच हाती. अखेर काही तासांनी ही गर्दी ओसरली होती. शहरातील डी. बी. जैन रुग्णालयातही सकाळी गर्दी झाली होती.

प्राप्त झालेले डोस

कोविशिल्ड ५६, ६००

काेव्हॅक्सिन ६ हजार

शहर : ५८५० कोविशिल्ड, १२०० कोव्हॅक्सिन

मनपाचे असे नियेाजन

शाहू महाराज रुग्णालय : १८ ते ४४ तसेच ४५ वर्षांवरील या दोन्ही वयोगटासाठी कोविशिल्डचा पहिला डोस

डी. बी. जैन रूग्णालय : ४५ वर्षंावरील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस

चेतनदास मेहता रुग्णालय : १८ ते ४४ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन पहिला डोस

नानीबाई रुग्णालय : १८ ते ४४ वयोगटासाठी कोविशिल्डचा पहिला डोस

दर्शनी भागात यादी

दोन दिवसांपूर्वी ध्वजाच्या खाली १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणाच्या नागरिकांची यादी लावण्यात आली होती. मात्र, ती यादी त्या ठिकाणाहून हटवून आता व्यवस्थित दर्शनी भागात लावण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना ते पाहणे सोयीचे होत आहे.

त्यांना कसे सोडले.. काढा त्यांना बाहेर

रेडक्रॉस रक्तपेढीच्या केंद्राबाहेर साडेबारा वाजेच्या सुमारास थोडी शांतता असताना अचानक रांग तोडत काही युवकांना आत सोडताच ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला व गोंधळाला सुरुवात झाली. त्यांना आत कसे सोडले आम्ही वेडे आहोत का? असा प्रश्न विचारत ज्येष्ठांनी तरुणांना बाहेर काढा असा आग्रह धरला. मोठमोठ्याने आवाज होत असल्याने गर्दी वाढली. बाहेर असलेल्या पोलिसांनी मंडपात धाव घेतली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन समजूत घातली व त्यांची ऑनलाईन नोंदणी झाली असल्याचे सांगत ज्येष्ठांची समजूत घातली. पंधरा ते वीस मिनिटे हा गोंधळ सुरू होता.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची स्वतंत्र व्यवस्था

ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून पोलिसांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी करीत जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील नॉन कोविडच्या आपात्कालीन कक्षात स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियेाजन करण्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक विभागाला लस

प्रत्येक शासकीय कार्यालयातच त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र लसीकरणाचे नियोजन असून यासाठी मोबाईल व्हॅन असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, आलेल्या लसीतून ७० डोस ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी राखीव राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Fair at centers for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.