कुटुंबीय क्वारंटाइन असताना जपली रुग्णसेवेची ‘आस्था’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:16 AM2021-03-08T04:16:22+5:302021-03-08T04:16:22+5:30
जळगाव : एकीकडे घरात आजन सासू कोरोनाबाधित होऊन संपूर्ण कुुटुंब क्वारंटाइन असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्णही वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
जळगाव : एकीकडे घरात आजन सासू कोरोनाबाधित होऊन संपूर्ण कुुटुंब क्वारंटाइन असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्णही वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांकडे दुर्लक्ष करून कसे चालणार? या विचाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. आस्था गणेरीवाल यांनी रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य दिले. यादरम्यान वृद्धांसह गंभीर आजाराच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करीत आपली रुग्णसेवेची आस्थाच एकप्रकारे त्यांनी जपली. त्यांच्या या सेवेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळून अनेकजण घरी सुखरुप परतले असून, वर्षभरापासून त्यांची अविरत सेवा अजूनही सुरूच आहे. महिलांनी निश्चय केला, तर त्या कोणत्याही संकटावर मात करू शकतात व इतरांनाही संकटातून बाहेर काढू शकतात, असा संदेशच त्यांनी महिला दिनानिमित्त दिला आहे.
मुंबई, पुणे येथे रुग्णसेवा करून तीन वर्षांपूर्वी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवा करीत असलेल्या डॉ. आस्था गणेरीवाल यांनी कोरोनापूर्वीही अनेकांवर यशस्वी उपचार करीत त्यांना संकटातून बाहेर काढले आहे. मात्र, गेल्यावर्षी मार्च महिन्यात संसर्ग वाढत गेलेला कोरोना सर्वांसाठी नवीनच असल्याने जळगावातील या रुग्णालयातही सर्वच डॉक्टर, अधिकारी याला यशस्वी सामोरे गेले. यात औषधवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. आस्था गणेरीवाल यांनी मोठ्या शहरातील वैद्यकीय सेवेच्या आपल्या अनुभवाचा येथेही पुरेपूर उपयोग करीत आलेल्या या नवीनच आजाराला सामोरे गेल्या.
याविषयी डॉ. गणेरीवाल यांनी सांगितले की, कितीही अनुभव असला तरी या नवीन आजाराविषयी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मोलाचे ठरले. जसजसे रुग्ण समोर येत गेले व त्यातही येणारे गंभीर रुग्ण हे मोठे आव्हान होते. विशेष म्हणजे कोरोनाचे रुग्ण तर येतच होते. मात्र, त्यासोबत मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा विविध आजाराच्या रुग्णांना अधिक धोका असल्याने त्यांच्याविषयीदेखील चिंता वाढत होती. मात्र, अनुभवातून सर्वकाही शिकता आले व कोरोनाबाधित असो अथवा इतरही आजाराच्या रुग्णांवर रुग्णालयातील सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांनी मिळून आलेल्या संकटाला परतावून लावल्याचे डॉ. गणेरीवाल यांनी सांगितले.
आजन सासू अतिदक्षता विभागात, इकडे रुग्णांवर उपचार सुरू
डॉ. आस्था गणेरीवाल या कोरोनाच्या काळात रुग्णसेवा करीत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली नाही. मात्र, घरात त्यांच्या आजन सासूंना कोरोना झाला असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. याच वेळी संपूर्ण कुटुंबीय क्वारंटाईन झाले. मात्र, असे असतानाही डॉ. गणेरीवाल यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत इकडे रुग्णालयात आपली रुग्णसेवाही सुरूच ठेवली. कोरोनाच्या काळात अजूनही त्यांची अविरत सेवा सुरूच असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे कोरोनाला हद्दपार करू, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
गांभीर्य नसल्याचेही आले अनुभव
कोरोनाविषयी एवढी जनजागृती केली जात आहे. प्रशासन, आरोग्य विभाग उपाययोजना करीत आहे. मात्र, नागरिकांना कोरोना गेला, असे वाटत आहे. तसे नाही, अजूनही काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. गणेरीवाल यांनी सांगत या विषयी रुग्णालयातील अनुभवही सांगितला. रुग्णालयात अनेकजण अजूनही विनामास्क येतात. यात एक रुग्ण तर त्याच्या चिमुकल्यासह विनामास्क रुग्णालयात आला, वावरला. यातून त्याच्यासह त्या चिमुकल्याचीही काळजी नाही, असे प्रश्न उपस्थित होतात. पुढे काय आहे, हे कोणीही सांगू शकत नाही, त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.