फैजाबाद एक्स्प्रेसचा अपघात टळला
By admin | Published: June 21, 2017 03:26 PM2017-06-21T15:26:47+5:302017-06-21T15:26:47+5:30
भुसावळ स्थानकात शिरण्यापूर्वीची घटना
Next
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.21 : 22103 मुंबई एलटीडी फैजाबाद सुपरफास्ट एक्सप्रेसच्या साधारण डब्यातील डायनामो बेल्टमधून अचानक धूर निघाला त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. आधी धूर निघाला व नंतर आग लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, रेल्वेच्या विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचा:यांनी धाव घेऊन तातडीने उपाय योजना केल्या त्यामुळे अपघात टळला. ही घटना बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास फजाबाद एक्स्प्रेस शहरातील रेल्वे दगडी पूलावर आऊटरला थांबली असताना घडली.
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई एलटीटीहून येणारी फैजाबाद एक्स्प्रेस भुसावळ स्थानकात येण्याआधी रेल्वे दगडी पूलाजवळ चालक गाडीला ब्रेक लावत असता या गाडीच्या साधारण श्रेणीतील डबा क्रमांक 00456 च्या पायदानाखाली असलेल्या व्हीलच्या (चाके) डायनामो बेल्टमधून अचानक धूर यायला सुरुवात झाली.त्यानंतर त्याला आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. दुपारची वेळ असल्याने व सर्व प्रवाशी जागी असल्याने ते गाडीच्या खाली उतरले. दरम्यान, ही घटना चालक व गार्ड यांनी तातडीने वरिष्ठाना कळविली. त्यामुळे भुसावळ स्थानकातून तातडीने संबंधित विभागाचे अधिकारी धावून आले. त्यांनी तत्काळ डायनामो बेल्ट व्यवस्थित करुन गाडीला स्थानकात आणण्यात आले. ही गाडी वेळेवर पुढे रवाना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
फैजाबाद एक्स्प्रेसच्या साधारण डब्याचा डायनामो बेल्ट ब्रेक लावताना थोडासा हालला त्यामुळे त्यातून धूर निघाला. आग लागली नाही. यामुळे गाडीला विलंब झाला नाही. प्रवाशांची गैरसोय झाली नाही. गाडी वेळेवर सुरक्षीतपणे पुढे रवाना करण्यात आली.
- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.