दिव्यांग सवलतीचे बनावट कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:03+5:302021-09-21T04:20:03+5:30
बनविणारे दोन जण ताब्यात जामनेर : एसटी व पोलिसांची तपासणी मोहीम जामनेर : एस.टी. प्रवासात सवलतीसाठी दिव्यांगांचे बनावट ओळखपत्र ...
बनविणारे दोन जण ताब्यात
जामनेर : एसटी व पोलिसांची तपासणी मोहीम
जामनेर : एस.टी. प्रवासात सवलतीसाठी दिव्यांगांचे बनावट ओळखपत्र तयार करुन देणाऱ्या टोळीतील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून आगारप्रमुख व जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांचे शिक्के असलेले कार्ड जप्त केले. कार्डवर अमळनेर येथील पत्ता असल्याने या टोळीचा अमळनेरशी असलेल्या कनेक्शनचा पोलीस तपास घेत आहेत.
शेख अब्दुल्ला शेख अमीन (रा. घरकूल जामनेर) व मंगेश विनायक सोनार (रा. जामनेर पुरा) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
एसटी प्रवासात अपंगांना ७५ टक्के प्रवास भाड्यात मिळणाऱ्या सवलतीसाठी गरजू अपंगांकडून तीन ते चार हजार रुपये घेऊन त्यांना सही शिक्क्यांचे कार्ड बनवून देणारे काही ठग शहरात आहेत. त्यांनी बनवून दिलेल्या बोगस कार्डचा वापर करुन काही जण प्रवास करीत असल्याने याचा संशय वाहकांना आला.
याबाबत एसटी महामंडळ व पोलिसांनी केलेल्या तपासात शेख अब्दुल्ला व मंगेश सोनार यांची नावे समोर आली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्यांना ताब्यात घेतले. एसटी कर्मचारी संभाजी रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर पाटील, योगेश महाजन, सुनील माळी, रियाज शेख, दिलीप वाघमोडे तपास करीत आहेत.