जनसुविधावरून सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफुस
By admin | Published: July 6, 2016 05:18 PM2016-07-06T17:18:09+5:302016-07-06T17:18:09+5:30
जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीतर्फे मिळालेल्या चार कोटी २० लाख रुपयांच्या जनसुविधा कार्यक्रमाच्या निधीसंबंधीच्या नियोजनावरून सत्ताधारी भाजपामध्ये दोन गट पडले आहेत.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीतर्फे मिळालेल्या चार कोटी २० लाख रुपयांच्या जनसुविधा कार्यक्रमाच्या निधीसंबंधीच्या नियोजनावरून सत्ताधारी भाजपामध्ये दोन गट पडले आहेत. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनाही डावलल्याची कुरबुर सुरू आहे.
जि.प.ला आमदारांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये निधी जनसुविधा अंतर्गत प्राप्त झाला होता. परंतु हा सर्व निधी आमदार व खासदार यांनी पळविला होता. त्याची ओरड सुरू झाल्यानंतर नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटी २० लाख रुपये अतिरिक्त निधी जि.प.ला देण्यात आला.
नियोजन अध्यक्षांकडे, याद्यांवरून गटबाजी
या निधीचे नियोजन अध्यक्ष यांना करायचे आहे. परंतु अध्यक्ष स्वकीयांनाही म्हणजेच भाजपाच्या विश्वासात घेत नाहीत. स्वकीयांना जसे डावलले जात आहे तसेच शिवसेनेतील पदाधिकाऱ्यालाही डावलले आहे.
त्रिकुटचा प्रभाव
निधीचे नियोजन सत्ताधारी व विरोधकांमधील त्रिकुटाच्या सांगण्यानुसार केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. हे त्रिकुट कोण याचा मुद्दा चर्चेत असून, त्याची तक्रार भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत भुसावळ तालुक्यातील एका सदस्याने केली आहे.
नियोजनास विलंब
नियोजन करण्याची तारीख ३० जून दिली होती. परंतु अजूनही नियोजन झालेले नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला विलंब होत असून, तक्रारी वाढत आहेत.