आकस्मिक प्राण गमावलेल्या शिक्षक बांधवांच्या कुटुंबाला होतेय आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:10+5:302021-06-06T04:13:10+5:30
पाचोरा तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्रित येत एक समन्वय समिती स्थापन केलेली होती. या समितीअंतर्गत पाचोरा तालुक्यातील आकस्मित ...
पाचोरा तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्रित येत एक समन्वय समिती स्थापन केलेली होती. या समितीअंतर्गत पाचोरा तालुक्यातील आकस्मित प्राण गमावलेल्या प्राथमिक शिक्षक किंवा शिक्षिका बंधू-भगिनींच्या कुटुंबासाठी एका शिक्षकाकडून किमान दोनशे रुपये किंवा स्वेच्छेने त्यापेक्षा अधिक रक्कम मयत निधी म्हणून संकलित केली जावी आणि या कुटुंबाला केवळ शाब्दिक किंवा भावनिक आधार देण्याऐवजी एक आर्थिक मदत देखील केली जावी, अशी अभिनव संकल्पना मांडण्यात आली आणि या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक आणि शिक्षिकांनी प्राण गमावलेल्या कुटुंबासाठी आर्थिक मदत संकलित करायला सुरुवात केली.
तालुक्यातील केंद्रस्तरावर ही जबाबदारी एका शिक्षकांकडे सोपवण्यात आली असून तालुक्यातील सुमारे साडेपाचशे प्राथमिक शिक्षक आपल्या स्वेच्छेने सेवेत असतानाच आकस्मिक प्राण गमावलेल्या शिक्षक-शिक्षिका यांच्या कुटुंबासाठी एक भरीव आर्थिक निधी उभारत असून या कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून काढण्यासाठी देखील शिक्षक संघटनांचा हा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे.
या कुटुंबांना झाली मदत
नुकतेच पत्नी, २ मुली, १ मुलगा, आईवडील, २ भाऊ असा मोठा परिवार असलेले नगरदेवळा येथील रहिवासी कोमलसिंग उत्तमसिंग राऊळ यांचे कोरोनामुळे निधन झाले. शिक्षकांच्या समस्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लढणाऱ्या या शिक्षकाच्या निधनामुळे आणि औषध उपचारासाठी सहा लाख रुपये खर्च झाल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या कुटुंबाला तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षकांकडून १ लाख ३० हजार ८६० रुपये एवढा मयत निधी जमा करून कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला तर यापूर्वी पहाण येथील संजय निकम, सांगवी येथील सुभाष श्रीधर सपकाळे, कन्या प्राथमिक शाळेतील रमेश भिला पाटील, जितेंद्र पवार, चव्हाण सर या मयत शिक्षकांसाठी पाचोरा तालुक्यातील सर्व जि.प. शिक्षकांनी याचप्रमाणे मयत निधी जमा करून सामाजिक जबाबदारी व जाणीव जोपासली आहे. याशिवाय सातगाव डोंगरी येथील आर.आर. पाटील आणि चंद्रभागा बन्सी भालेराव या दोन शिक्षकांसाठीदेखील मदत संकलित करण्याचे कार्य सुरू आहे.
प्रसिद्धीपासून दूर
उपक्रम राबवत असतात कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा संघटनांचे नाव देणे कटाक्षाने टाळले जात असून प्राथमिक शिक्षक संघटनांचे जे प्रतिनिधी ही मदत मयत शिक्षकाच्या कुटुंबापर्यंत पोहोचवितात ते प्रतिनिधीदेखील मदत देत असतानाचे छायाचित्र सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करणे जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे या उपक्रमाचा उद्देश अधिकच नि:स्वार्थ जाणवतो आणि सामान्य माणसांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी गुरुजींनी गुरुजींसाठी राबविलेला हा उपक्रम आणि व्यक्त केलेली संवेदना मानवतेचे आदर्श उदाहरण ठरते.