मातब्बरांनाही स्पर्धकाविषयी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:46 PM2019-09-29T12:46:55+5:302019-09-29T12:48:16+5:30

एकनाथराव खडसे, जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द उमेदवार कोण?, बंडखोरी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी जागावाटप, अधिकृत उमेदवार यादीविषयी दिल्ली-मुंबईत घोळ

Family too keen on competition | मातब्बरांनाही स्पर्धकाविषयी उत्सुकता

मातब्बरांनाही स्पर्धकाविषयी उत्सुकता

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्टÑवादी यांच्यातील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. जागावाटप नसल्याने अधिकृत उमेदवारांची यादीही लटकलेली आहे. शेवटच्या दिवशी ४ रोजी अधिकृत उमेदवाराच्या हाती थेट एबी फॉर्म दिला जाईल, असे वाटते. बंडखोरी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही खबरदारी बाळगली जात असली तरी मातब्बर नेत्यांविरोधात उमेदवार कोण हेदेखील अद्याप निश्चित झालेले नाही. लढतीची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार असे दिसते.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी युती आणि आघाडीचे जागावाटप सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करायला चार दिवस उरलेले असताना अधिकृत उमेदवार यादीची प्रतीक्षा आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चा आणि त्याचे उमटलेले पडसाद लक्षात घेता काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी निश्चित झालेली आहे. खान्देशातील २० जागांपैकी काँग्रेस ९ तर राष्टÑवादी ११ जागा लढवेल, असे सूत्र आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव शहर या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर धुळ्यात विद्यमान आमदार असलेल्या धुळे ग्रामीण, शिरपूर व साक्री या जागा तर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व चार म्हणजे नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील ९, धुळ्यातील धुळे शहर व शिंदखेडा अशा ११ जागा राष्टÑवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.
जागावाटप अधिकृत जाहीर झाले नसले तरी त्याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने काँग्रेस व राष्टÑवादीमध्ये पडसाद उमटले. जळगावातील काँग्रेस भवनात नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रोष व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. राष्टÑवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी पदाचा राजीनामा दिला. केवळ जागावाटपाचे सूत्र अनधिकृतपणे जाहीर होताच, ही प्रतिक्रिया उमटली. सत्ताधारी भाजप-सेना युतीचे जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर झाल्यावर किती मोठी प्रतिक्रिया उमटेल, याची कल्पना केलेली बरी.
याची पुरेपूर कल्पना पक्षश्रेष्ठींना असल्याने सावधपणे व गोपनीयता बाळगून युती-आघाडीची बोलणी सुरु आहे. अगदी राज्याचे लक्ष लागून असलेल्या मातब्बरांच्या मतदारसंघातही अद्याप लढती निश्चित झालेल्या नाहीत, यावरुन परिस्थिती किती नाजूक आहे, हे स्पष्ट होते.
एकनाथराव खडसे यांच्याविरोधात कोण उभे राहणार हे अद्याप निश्चित नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे अपक्ष उभे राहतील काय? राष्टÑवादी कुणाला संधी देते? पाटील यांना पाठिंबा देते काय? जयकुमार रावळ यांच्या विरोधात संदीप बेडसे की, श्यामकांत सनेर? गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द विशाल देवकर, ज्ञानेश्वर महाजन, लकी टेलर की आणखी कोणी? डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात कोण राहील? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
पुढच्या सोमवारी, ७ आॅक्टोबरला माघार आहे, तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होईल. तोवर प्रत्येक पैलवान शड्डू ठोकून मैदानात जोर बैठका मारताना दिसेल.
एकनाथराव खडसे यांच्याविरुध्द चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी राहतील का? जयकुमार रावल यांना पुन्हा संदीप बेडसे, श्यामकांत सनेर यांच्याशी मुकाबला करावा लागेल का? सलगपणे विजय मिळविणाऱ्या डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासमोर प्रबळ उमेदवार देण्याचा शोध अद्याप संपलेला नाही. कुणाल वसावे, डॉ.राजेश वळवी यांच्यासोबत अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

Web Title: Family too keen on competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव