कौटुंबिक वादातून पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:45 PM2018-10-30T16:45:27+5:302018-10-30T16:49:00+5:30
कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (भोद बु., ता.धरणगाव) येथे सायंकाळी सहा वाजता घडली.
जळगाव : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (भोद बु., ता.धरणगाव) येथे सायंकाळी सहा वाजता घडली. सुवर्णा मनोज देसले (वय ३०, रा.भोद बु.ता.धरणगाव) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आॅगस्ट महिन्यातही शहरात सुवर्णा यांना अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटविण्याचा प्रयत्न झाला होता.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुवर्णा व पती मनोज देसले यांच्यात न्यायालयात केस सुरू आहे. सुवर्णा यांनी ही केस मागे घ्यावी म्हणून पतीसह सासरच्यांमध्ये वाद आहेत. पती मनोज देसले याने भोद येथील मालमत्ता विक्री करून जळगाव शहरात घर घेतले आहे. पतीवगळता संपूर्ण कुटुंब शहरातच स्थायिक आहे. सुवर्णा व मुलगा कौस्तुभ असे दोन्ही जण भोद येथे वास्तव्याला आहेत. गेल्या पाच दिवसांपासून आई शैलाबाई या सुवर्णा यांच्याकडे आलेल्या आहेत. सोमवारी सायंकाळी पती घरी आला व काही न सांगता पत्नीच्या पोटात, मांडीवर डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. आरडाओरड झाल्याने आई शैलाबाई धावत आल्या. त्यांनी सुवर्णा यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
उपचारावरून रुग्णालयात गोंधळ
जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर उपचार करण्यात हलगर्जीपणा तसेच यापूर्वी जिवंत ठार मारण्याचा गुन्हा दाखल असतानाही पोलिसांनी सुवर्णाच्या सासरच्यांना अटक केली नाही म्हणून छावा संघटनेच्या वंदना पाटील, रेखा पाटील, मनीषा पाटील यांनी संताप व्यक्त केला. आमदार सुरेश भोळे यांनीही रुग्णालयात जखमीची भेट घेतली. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनाही महिलांनी संशयितांच्या अटकेविषयी जाब विचारला. दरम्यान, या जखमी सुवर्णा यांची प्रकृती चिंताजनक आहे. आई व मुलाचा प्रचंड आक्रोश सुरू होता. छावा संघटनेच्या महिलांनी त्यांना धीर दिला.