यावल तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा यात्रेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 07:53 PM2020-01-25T19:53:45+5:302020-01-25T19:54:50+5:30
खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा यात्रेस शनिवारपासून सुरवात झाली.
यावल, जि.जळगाव : खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा यात्रेस शनिवारपासून सुरवात झाली.
आज यात्रेचा पहिला व माघ शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवार अशा या दोन दिवसासह पौर्णिमेस यात्रा असते. शनिवारी भाविकांनी मुंजोबाच्या दर्शनार्थ गर्दी केली होती. पो. नि. अरूण धनवडे यांनी पहाटे मुंजोबा देवस्थानला भेट दिली. त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील शनिवारी व सोमवारी ही यात्रा भरते. या वर्षी २५ जानेवारी शनिवार, २७ जानेवारी सोमवार, १ फेबु्रवारी शनिवार, ३ फेब्रुवारी सोमवार, ८ फेब्रुवारी शनिवार व ९ फेब्रुवारी पौर्णिमा असे वार पडणार आहेत.
मुंजोबा नवसाला पावणारे दैवत आहे. यामुळे भाविकांची श्रद्धा असल्याने येथे यात्रेत अनेक जण नवस फेडण्यासाठी येथे येतात. त्यानिमित्ताने आप्तेष्ठांसह मित्रमंडळींसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. यात्रेत आकाश पाळणे विविध संसारोपयोगी वस्तूंसह मनोरंजनाची दुकाने थाटली आहेत. बंदोबस्तासाठी पो. नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.