गणपती बाप्पाला आज निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:18 AM2021-09-19T04:18:28+5:302021-09-19T04:18:28+5:30
भुसावळ : गेल्या दहा दिवसाोपासून अत्यंत भक्तिमय वातावरणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध नियमांचे पालन करीत शहरात गणेशोत्सव साजरा झाला. रविवारी ...
भुसावळ : गेल्या दहा दिवसाोपासून अत्यंत भक्तिमय वातावरणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध नियमांचे पालन करीत शहरात गणेशोत्सव साजरा झाला. रविवारी १९ रोजी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी यंदा पोलीस प्रशासन तगड्या बंदोबस्तासह सज्ज आहे. मिरवणुकीस परवानगी नसल्याने पालिका प्रशासनाकडून गणेशमूर्तींचे संकलन करून पालिकेकडूनच विसर्जन केले जाणार आहे.
भुसावळ शहरातील राहुल नगर, रेल्वे फिल्टर हाऊस व महादेव घाट जवळील तापी नदीपात्रात विसर्जनासाठी पालिका प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनाच्या दृष्टीने शहरात रविवारी सकाळपासूनच पोलीस प्रशासनाचा खडा पहारा आहे. २०० होमगार्ड, आरसीपी प्लाटून ट्रॅकिंग फोर्स, सीआरपीएफचे जवान याशिवाय प्रत्येक मंडळासोबत पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासनातर्फे शहरासह ग्रामीण भागामध्ये सातत्याने गस्त घालण्यात येणार आहे.
श्री विसर्जनासाठी १० संकलन केंद्र
एकाच ठिकाणी श्री विसर्जनासाठी गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून कोरोनाचा काळ लक्षात घेता शहरात नऊ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहे. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मूर्ती संकलन म्युनिसिपल हायस्कूल, गडकरी नगर, गणपती मंदिर, राहुल नगर, रेल्वे फिल्टर हाऊस, नाहाटा कॉलेज चौफुली अंडरपास खाली, डी. एल. हिंदी हायस्कूल, विठ्ठल मंदिर वॉर्ड, प्रभाकर हॉल, डी. एस. हायस्कूल ,महादेव घाट या ठिकाणी होणार आहे.
जीवन रक्षक दलाचे कर्मचारी
करतील नदीपात्रात विसर्जन
रेल्वे फिल्टर हाऊस, राहुल नगर व महादेव घाट या तापी नदी पात्राजवळ पालिका प्रशासनाच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावले असून या ठिकाणी गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता विद्युत प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बॅरिकेड्स पर्यंतच गणेश मंडळांना प्रवेश देण्यात आला असून त्या पुढे मूर्ती ही जीवनरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना हस्तांतरित करण्यात येईल व ते पुढे गणपती मूर्तीचे विसर्जन करतील.
ॲम्ब्युलन्स व फायर ब्रिगेडची गाडी सज्ज
श्री विसर्जन दरम्यान दुर्दैवाने काही अपघात घडल्यास याकरिता ॲम्ब्युलन्स तसेच फायर ब्रिगेडची गाडीही सज्ज राहणार आहे.
ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना नो एंट्री
कोरोना काळात ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनातर्फे त्यांना नो एन्ट्री जाहीर केली आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत वेळेच्या आतच विसर्जन व्हावे याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
खड्ड्यांचा विसर्जनाला अडसर
शहरांमध्ये विसर्जन मार्गावर खूप खड्डे आहेत. मिरवणुकीला जरी बंदी असली तरी नियमानुसार नदी पात्रापर्यंत जाण्यासाठी गणेश मंडळांना असा खडतर प्रवास करूनच श्री विसर्जन करता येणार आहे.
भुसावळ येथे विसर्जन केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी करताना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, प्रमोद पाटील आदी.