सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याने कवटाळले मृत्यूला; घरात सर्वजण झोपलेले असताना घेतला गळफास
By विजय.सैतवाल | Published: December 19, 2023 12:59 PM2023-12-19T12:59:36+5:302023-12-19T13:00:22+5:30
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कर्जासह आजाराला कंटाळले असल्याचाही उल्लेख केला आहे.
विजयकुमार सैतवाल
जळगाव : ‘माझ्यावर कर्ज झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, अशी चिठ्ठी लिहून शिवाजी चिंधू पाटील (५५, रा. धानवड, ता. जळगाव) या शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कर्जासह आजाराला कंटाळले असल्याचाही उल्लेख केला आहे.
धानवड येथे शिवाजी पाटील यांची शेती असून त्यासाठी वि.का. सोसायटी व खासगी कर्ज घेतले होते. त्यात यंदा पाऊस कमी झाल्याने व कापसाच्या पिकावर परिणाम होऊन उत्पन्न कमी आल्याने गेल्या सात ते आठ दिवसांपासून कर्ज कसे फिटणार, या विवंचनेत ते होते. मंगळवार, १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता झोपेतून उठून त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेतला.
बराच वेळ झाला तरी ते न आल्यामुळे पत्नी व मुलाने मागच्या खोलीत जाऊन पाहिले असता शिवाजी पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांना शेजारील मंडळी व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी पाटील सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘आजाराला कंटाळून फाशी घेत आहे, माझ्यावर कर्ज झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ असे नमूद केले आहे.
मुलांनी काढली होती समजूत, तरीही टोकाचे पाऊल
कर्जामुळे शिवाजी पाटील हे विवंचनेत होते, त्यामुळे पत्नी, मुलांनी त्यांची समजूत काढून सर्व सुरळीत होईल, असा धीर देते होते. तरीदेखील त्यांनी मंगळवारी पहाटेच टोकाला निर्णय घेत जीवन संपविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवडे आहेत.