शेतकरी नवरा नको गं बाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:59+5:302021-03-20T04:15:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लग्न जुळविताना आता वधू पक्षाकडून विविध अपेक्षा, अटी ठेवण्यात येतात. यात मुलगा हा शासकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लग्न जुळविताना आता वधू पक्षाकडून विविध अपेक्षा, अटी ठेवण्यात येतात. यात मुलगा हा शासकीय नोकरीला हवा, यालाच अधिकतर वधू पक्षाकडून प्राधान्य दिले जात असून, यासह एकत्रित कुटुंबाला, तसेच शेतकरी, व्यापारी वर नसावा, अशाही अपेक्षा वधू पक्षांकडून येत असतात, असे वधुवर मेळाव्यांचे आयोजन करणाऱ्या अनेक मान्यवरांनी सांगितले.
प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली असून, रोजगार हा यात कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच शासकीय नोकरीकडे सर्वाधिक कल वाढल्याचे चित्र आहे. शासकीय नोकरीबाबत अनेक समज समाजांमध्ये असून, पगार, सुट्ट्या, कमी काम अशा काही धारणा यात आहेत. सर्व सुविधा मिळतात, असाही समज आहे. त्यामुळे शासकीय नोकरीला प्राधान्य दिले जाते. वधू पक्षाकडूनही यालाच प्राधान्य दिले जात आहे, शिवाय ग्रामीण नव्हे, तर शहरी भागाला अधिक पसंती दिली जात आहे.
शासकीय नोकरीला अधिक मागणी
मुलगा हा शासकीय नोकरीत हवा, वेतन २० हजारांपेक्षा अधिक हवे, याला प्राधान्य दिले जाते. शेतकरी किंवा व्यापारी वर्ग नसावा, अशा अपेक्षा वधू पक्षाकडून समोर येत असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टर, इंजिनीअर यांनाही प्राधान्य दिले जात आहे.
या टाकल्या जातात अटी
एकत्रित कुटुंब नसावे, बहीण किंवा भावाची जबाबदारी नसावी, शक्यतोवर स्वतंत्र राहणारा वर असावा, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात असावा. त्यातही पुणे, मुंबईचा वर असावा, अशा अटी वधू पक्षाकडून टाकल्या जात आहेत.
कोट
वधू पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आम्ही गेली पंधरा वर्षे यात कार्यरत असून, यात आम्हाला हा अनुभव येत आहे. मुलगा नोकरीवरच हवा,
शहरातच हवा, त्यातही पुणे, मुंबईला हवा, ग्रामीण भागात नको, एकत्रित कुटुंब नको, अशा अटी वधू पक्षाकडून असतात.
- बाजीराव पाटील, अध्यक्ष,
आम्ही मराठा फाउंडेशन
कोट
शेतकरी वराला शक्यतोवर नकारच असतो. नोकरी हवी, उत्पन्न अधिक हवे आणि शहरच हवे, अशा अपेक्षा वधू पक्षाकडून असतात. आपले उत्पन्न
जेवढे त्यापेक्षा आपल्या जावयाचे उत्पन्न अधिकच हवे, अशी वधुपित्याची अपेक्षा असते, शिवाय मुलगी उच्चशिक्षित असल्यास, आपल्यापेक्षा
उच्चशिक्षित वर हवा, अशीही अपेक्षा असते.
- दत्तात्रय चौधरी, संचालक, खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगाव
कोट
वधू पक्षाचे शक्यतोवर शासकीय नोकरीलाच प्राधान्य असते. व्यापारी व शेतकरी वर्ग नको, असे सांगितले जाते. अगदी क्वचित वधू पक्षाच्या अपेक्षा
यापेक्षा वेगळ्या असतात. यासह मुंबई, पुणे येथील वर हवा, अशाही अपेक्षा असतात. आमच्याकडे काही स्थळे आली होती, त्यांनी आवर्जून जळगाव
जिल्ह्यातच स्थळ हवे, व्यापारी हवा, अशी अपेक्षा त्यांची होती.
- लक्ष्मीकांत चौधरी, अध्यक्ष, लेवा नवयुवक संघ