पिलखेडा येथील शेतकऱ्याने केळीला शोधला पेरुचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:06 PM2019-07-01T12:06:20+5:302019-07-01T12:08:39+5:30
ग्रामीण भागात नव्या प्रयोगाची नवलाई : जिल्हा परिषद सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी केली फळबागेची पाहणी, रोज येतात किमान १० ते १२ शेतकरी भेटीला
चुडामण बोरसे
जळगाव : केळीवर वारंवार येणारी संकटे आणि नुकसान यावर पिलखेडा येथील किशोर चौधरी यांनी केळीला पेरुचा पर्याय शोधला आहे. किमान किलोभर वजनाचा एक पेरु या फळबागेत येत आहे. हे पेरु आता मुंबईच नाही तर दिल्ली आणि गुजरातच्या बाजारपेठतही पाठविले जात आहेत.
जळगावपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिलखेडा येथील किशोर चौधरी आणि त्यांच्या बंधूची ४० एकर शेती आहे. यापैकी १० एकरावर ते फळबाग लावतात तर २० एकरावर केळी लावायचे.
किशोर यांच्या दहावीपर्यंत शिक्षण झाले. दहावीत असताना शेतीची जबाबदारी त्यांच्याकडे आली. शेतीमध्ये वेगळे काही प्रयोग करण्याचे विचार तेव्हापासून सुरू झाले. काही वर्षापूर्वी कृषी प्रदर्शनात त्यांनी भला मोठा एक डाळिंब पाहिला होता. याप्रमाणेच आपणही काही प्रयोग करावा असा विचार त्यांच्या मनात आला. पण एक-दीड वर्ष काहीच सूचले नाही. शेवटी चार वर्षांपूर्वी फळबाग योजनेचा विचार मनात आला आणि त्याला लागलीच मूर्त स्वरूप दिले. बाग तयार केली आणि पेरूची लागवड सुरू झाली. ही फळबाग सेंद्रीय पद्धतीने तयार करण्यात आली. आठ एकरात त्यांनी ४६०० पेरू रोपांची लागवड केली आहे. रायपूर (छत्तीसगड) येथून ही रोपे आणण्यात आली. पेरू पिकांना कव्हरींग, फवारणी यासाठी प्रचंड खर्च आला. त्याची तमा न बाळगता त्यांनी या रोपांचे संगोपन केले. यातून मग चांगली फळे आकाराला आली. एक पेरू ८०० ते १००० ग्रॅम वजनाचा आहे.
परंपरागत फळ लागवड ही खड्डे खोदून केली जाते. परंतु चौधरी यांनी गादी वाफे तयार करून, त्यात खड्डे करून पेरूची लागवड केली आहे. लागवड करताना ठिंबक सिंचन बसविण्यात आले. यातून या रोपांना मोठ्या प्रमाणात फळ धारणा झाली असून हे पेरू आता मुंबईसोबतच गुजरात आणि दिल्लीच्या बाजारपेठेतही जात आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी या फळबागेची पाहणी केली.
शेतकऱ्यांनी नव- नवीन प्रयोग करायाल हवेत. आमच्याकडील पेरुला अॅपल टेस्ट आहे, आणि यापुढे त्यातही नवीन काही करुन पेरु परदेशी पाठविण्याचा मानस आहे.
-किशोर चौधरी, शेतकरी, पिलखेडा ता. जळगाव.