लासूर येथे सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:06 PM2018-06-17T13:06:51+5:302018-06-17T13:06:51+5:30
माळी यांना कर्जमाफीचा लाभ नाहीच
चोपडा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील लासूर येथील वासुदेव बुधा माळी (महाजन, वय ६५) या शेतक-याने सततच्या नापिकीने व कर्जबाजारीपणामुळे शेतात गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत प्राप्त वृत्त असे की, १६ रोजी रात्री ११ वाजता शेतात कापूस पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या वासुदेव बुधा माळी या शेतकºयाने १७ रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी शेतातील झाडाला दोर बांधून गळफास घेतला. गतवर्षी आपल्या तीन एकर शेतात कापूस लावला मात्र तो बोंडअळीने फस्त केला. त्यावेळी कांदा पिकाला भाव चांगल्या प्रकारे होता म्हणून त्यांनी शेजारच्या शेतक-याकडून पाणी घेऊन कांदा पिकाचे उत्पादन घेतले. मात्र तो कांदा काढणीवर येताच दोन रुपये किलोच्या दराने त्यांना विकावा लागला. या सततच्या नापिकीने व उत्पादन खर्चही न निघाल्याने वासुदेव माळी कर्जबाजारी झाले. आपला संसार कसा भागणार अशा विवंचनेत ते नेहमी असायचे तरीही त्यांनी मोठ्या उमेदीने यावर्षी दुसºया शेतकºयाकडून पाणी घेऊन एक एकर कापूस लावला त्यास रात्री पाणी भरण्यासाठी ते गेलेले होते. तेथेच त्यांनी झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
माळी यांना कर्जमाफीचा लाभ नाहीच
मोठा गाजावाजा करीत शासनाने कर्जमाफी केल्याचा दावा केला. त्या योजनेचा आपल्यालाही लाभ होईल म्हणून वासुदेव माळी यांनी कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज केला, मात्र त्यांच्यावर असलेले ४३ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले नाही. कर्जमाफीचाही लाभ त्यांना मिळाला नसल्याने यावर्षीच्या नवीन कर्ज वितरणात त्यांचे नाव नसल्याने ते व्यथीत होते. आता पुढे शेती कसण्यासाठी पैसा कसा उभारावा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा असा परिवार आहे.
याबाबत विजय शिवराम माळी रा. लासूर यांच्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरन २९/२०१८ सी आरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक भीमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील हे करीत आहेत.