शेतकऱ्याने ट्रॅक्टरभर टरबूज दिले फेकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:01 PM2020-05-05T12:01:18+5:302020-05-05T12:01:55+5:30
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाची मुजोरी
जळगाव : सुरक्षित अंतर पाळत नसल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हॉकर्सवर कारवाई केली जात आहे. मात्र, या विभागाने सुरक्षित अंतराच्या नावावर कोणत्याही विक्रेत्यावर कारवाई करण्याचे प्रकार सुरु केले असून, सोमवारी एका शेतकºयाला कृषी विभागाने शेतमाल विक्रीसाठी परवाना दिला असतानाही मनपाच्या पथकाने शेतकºयाचा दोन ट्रॅक्टर माल जप्त केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकºयाने ट्रॅक्टरभर टरबूज मनपाच्या आवारात फेकून आपला निषेध व्यक्त केला.
शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता यावा, यासाठी कृषी विभागाने अनेक शेतकºयांना माल विक्रीसाठी परवाने दिले आहेत. मात्र, शेतकºयांकडे परवाना असतानाही मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी शेतकºयांचा माल जप्त करून घेत आहेत. याआधीही जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी शेतकºयांचा माल सोडविण्याबाबत तत्कालीन उपायुक्त अजित मुठे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, सोमवारी पुन्हा शेतकºयांचा माल जप्त करण्याचा प्रकार घडला आहे.
परवाना दाखविल्यावरही जप्त केला माल
जळगाव तालुक्यातील उमाळा येथील शेतकरी अनिल खडसे हे आपल्या शेतातील टरबूज ट्रॅक्टरमध्ये जळगावात विक्रीसाठी आलेले होते. शहरात ते टरबूज विकत असताना मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यांच्याशी हुज्जत घातली. अशा रितीने टरबूज विक्री करता येणार नाही, असे सांगत त्यांचे दोन ट्रॅक्टर जप्त करून ते थेट महापालिकेत आणले. अनिल खडसे यांनी मनपाच्या अधिकाºयांना शेतमाल विक्रीसाठी कृषी विभागाने दिलेला अधिकृत परवानादेखील दाखवला. मात्र, मनपाच्या पथकातील कर्मचाºयांनी शेतकºयांची बाजू ऐकून घेतली नाही.
संतापाच्या भरात ट्रॅक्टरभर टरबूज फेकले
शेतकºयांची बाजू न ऐकता दोन ट्रॅक्टरभर माल मनपाच्या पथकाने जप्त केल्यानंतर शेतकरी आपला माल सोडविण्यासाठी मनपात दाखल झाला. विनवण्या करूनदेखील मनपाने जप्त माल सोडण्यास नकार दिल्यामुळे संतप्त शेतकºयाने ट्रॅक्टरमधील संपूर्ण माल मनपाच्या आवारात फेकायला सुरुवात केली. काही कर्मचाºयांनी शेतकºयाला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र संतापाच्या भरात संपूर्ण माल मनपाच्या आवारात फेकून मनपा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शेतकºयांचा माल पकडल्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जप्त केलेला माल सोडण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या. मात्र, त्याआधीच शेतकºयाना आपला माल फेकून दिला होता.
राष्टÑवादीचे पदाधिकारी आक्रमक
शेतकºयांचा माल जप्त केल्यानंतर राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी उपायुक्त संतोष वाहुळे यांची भेट घेत शेतकºयांवर कारवाई करू नये , अशी मागणी केली. तसेच अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच. एम. खान यांना धारेवर धरले.
असोद्याच्या शेतकºयांनी दिले निवेदन
शहरात भाजीपाला व फळ विक्रीसाठी येणाºया शेतकºयांचा माल मनपाकडून मुद्दामहून जप्त केला जात असून, याबाबत मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच. एम. खान सहभागी आहेत, त्यांचे निलंबन करण्याची मागणी आसोदा येथील शेतकरी किशोर चौधरी यांनी केली. यासंबधी त्यांनी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांना निवेदन दिले.
शेतकºयांना शहरात माल विक्रीसाठी ९ ठिकाणे निश्चित करून दिली आहेत. मात्र, शेतकरी जर सुरक्षित अंतराचे पालन करत असतील तर त्यांना शहरातील कोणत्याही मुख्य चौकात व्यवसाय करण्याची परवानगी आहे. जर सुरक्षित अंतराचे पालन होत नसेल तर मनपाकडून कारवाई केली जाते. संबधित शेतकºयांचा जप्त माल सोडण्याची परवानगी देण्यात आली होती.
-सतीष कुलकर्णी, आयुक्त