मनवेल येथील शेतमजूर महिलांचा चौथ्या दिवशीही कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:03+5:302021-06-09T04:21:03+5:30
वाढत्या महागाईमुळे १०० रुपये मजुरी महिलांना परवडत नसल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून दगडी व मनवेल येथील महिला कामावर बहिष्कार टाकून ...
वाढत्या महागाईमुळे १०० रुपये मजुरी महिलांना परवडत नसल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून दगडी व मनवेल येथील महिला कामावर बहिष्कार टाकून घरीच आहेत, तर मनवेल ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरपंच जयसिंग सोनवणे यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली होती.
सरपंच जयसिंग सोनवणे यांनी गावातील महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी बसस्थानकाजवळील महर्षी वाल्मीक बसस्थानकाजवळ शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ८ वाजता हजर राहून समस्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला, मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे तोडगा निघाला नाही.
चार दिवसांपासून मजूर घरीच
दगडी या आदिवासी गावातील मजुरीच्या दरात वाढ करण्यासाठी काम बंद केल्याने चार दिवसांपासून घरीच आहे.
साकळी येथील मजूर येतात गावात
दगडी व मनवेल येथील मजूर महिलांनी रोजंदारीत वाढ करण्यासाठी चार दिवसांपासून बहिष्कार घातला आहे. त्यामुळे साकळी येथील महिला गावात कामावर येत असल्यामुळे मजुरीत वाढ करण्याचा तोडगा निघाला नाही.
संध्याकाळी पाच वाजता ४० ते ४५ महिला जमा झाल्या होत्या. मात्र महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्यामुळे महिलांच्या हिरमोड झाला.
रविवारपासून कामावर टाकण्यात आलेला बहिष्कार बुधवारीसुध्दा कायम आहे. कामबंद करून रोजंदारीत वाढ करण्यासाठी संप कायम असल्याचा निर्धार महिलांनी केला आहे.