तोंडापूरला बिबट्यांच्या संचाराने शेतकरी भयभित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:41 AM2018-11-17T01:41:26+5:302018-11-17T01:46:15+5:30
तोंडापूर लगतच्या जंगलात मोठी वृक्षतोड झाल्याने वन्यप्राण्यांचा गावाजवळ संंचार वाढला असून त्यात दोन बिबटे शेतांमध्ये दिसल्याने शेतकरी भयभित झाले आहेत.
तोंडापूर ता.जामनेर : येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शेतशिवारात चक्क दोन बिबट्यांचा रोजच वावर आढळून येत असल्याने शेतकरी भयभित झाले आहेत. वनविभागाने या बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
तोंडापूर जवळील डोंगराच्या भागात जंगलतोड झाल्याने बिबट्या, निलगाय, रानडुकरे या सारखे वन्यप्राण्यांनी गावाकडे धाव घेणे सुरू केल्याने शेतात वास्तव्याला असलेल्या शेतकऱ्यांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबाबत अजिंठा येथील वनविभागाला कळविले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.
तोंडापूर येथील कासम शाह नजीम शाह यांच्या गट नंबर २६ मधील राक्षा शिवारात बिबट्या बैलावर धावून आला होता. तर एका बिबट्याने एका शेतकºयाच्या बकरीवर हल्ला चढवून तिला ठार मारले, त्यामुळे शेतकरी आणि रहिवाशांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
सहा वर्षापूर्वी याच राक्षा शिवारात बिबट्याने शेतात कपाशी वेचणाºया एका अठरा वर्षीय मुलीवर हल्ला चढवून तिला जबर जखमी केले होते. तर एका मुलाला जीव गमवावा लागला होता. वन विभागाच्या सहा वर्षापूर्वीच्या माहीतीनुसार या परिसरात एकूण अकरा बिबट्यांचा संचार होता. त्या पैकी दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. तर तीन महिन्यांपूर्वी एक बिबट्या शेतात मृतावस्थेत सापडला होता. आता मात्र आठ बिबट्यांचा मुक्तपणे संचार सुरु असून दोन बिबटे शेतकºयांच्या नजरेस पडले आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी किंवा त्यांना पकडून इतरत्र पाठविण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.
बिबट्याच्या भितीने शेतीत कोणी येईना
या परिसरात सध्यस्थीतीत दोन बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकºयांनी सांगितले. शेतात कपाशी वेचणीवर आली असतांना बिबट्याच्या भितीने कोणीही कामावर येण्यास तयार होत नसल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.