दादरचे भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:55+5:302021-03-17T04:16:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० ...

Farmers close auction due to reduction in Dadar prices | दादरचे भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

दादरचे भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी केल्यामुळे संतापलेला शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील लिलाव प्रक्रिया बंद केली. तसेच सचिव कार्यालयामध्ये जाऊन दरवाजाचे काच फोडून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

गेल्या १५ दिवसापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या दादरला ३५०० ते ३ हजार रुपयांचा प्रति क्विंटल इतका भाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दादरचे भाव तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच लिलावादरम्यान व्यापाऱ्यांकडून २२०० रुपयांपर्यंतचे दर दिले जात आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून दादरीवर दोन किलोची कट्टी देखील लावली जात आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास असोदा, भादली व कडगाव या भागातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला असताना व्यापाऱ्यांनी अचानक भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच खासगी बाजारात दादरला चांगला भाव असतानादेखील अचानकपणे भाव कमी केल्याने शेतकरी व व्यापारामध्ये काही काळ वाद निर्माण झाला.

दादर विक्री न करण्याचा निर्णय

दादरला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच जोपर्यंत योग्य भाव मिळणार नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासना विरोधात देखील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

सचिव कार्यालयाची केली तोडफोड

एक तास बाजार समितीच्या आवारात गोंधळ घालून देखील व लिलाव बंद पाडून देखील शेतकऱ्यांची कोणत्याही संचालकांनी दखल न घेतल्याने. संतप्त शेतकऱ्यांनी थेट सचिव कार्यालयात जाऊन दरवाजाची व इतर साहित्याची तोडफोड केली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून समिती प्रशासनाने तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबतची सूचना दिली.

शेतकऱ्यांना अटक व सुटका

बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनाला सूचना दिल्यानंतर काही काळातच एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत कुठलीही फिर्याद किंवा तक्रार न दिल्याने शेतकऱ्यांना तात्काळ सोडण्यात आले.

व्यापाऱ्यांकडून मनमानी कारभार

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने धान्याचे भाव कमी व जास्त केले जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. तसेच या व्यापाऱ्यांना बाजार समितीमधील संचालक मंडळाचा देखील पाठिंबा मिळत असल्याचाही आरोप केला. वाद वाढत असल्याने दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेतली. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने दुपारीही लिलाव बंद ठेवला. यावेळी असोदा येथील किशोर चौधरी, पंकज चौधरी, भादली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद चौधरी व भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख गोपाल भंगाळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोट..

कोणतीही सूचना न देता जर भाव कमी केले जात असतील, किंवा शेतकऱ्यांच्या माल घेण्यास टाळाटाळ केली जात असेल तर अशा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल.

-कैलास चौधरी, सभापती

Web Title: Farmers close auction due to reduction in Dadar prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.