पातोंडा येथील शेतकऱ्याचे दादर पीक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 03:54 PM2021-03-28T15:54:19+5:302021-03-28T15:54:52+5:30
पातोंडा येथील शेतकऱ्याचे दादर पीक जळून खाक झाले.
पातोंडा, ता.अमळनेर : येथील एका शेतकऱ्याची दोन बिघे दादर पिकाची कापणी करून आळशिवर पडलेली असताना जळून खाक झाली. यामुळे अंदाजे २० ते २२ हजारांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
भगवान निंबा खैरनार यांची खवशी शिवारात शेती आहे. त्यांनी त्यापैकी दोन बिघे शेती बाबूलाल हिलाल पाटील यांना उक्ते दिलेली आहे. बाबूलाल पाटील यांनी खरीप हंगामात मूग टाकला होता. पण अति पावसामुळे मुगाचे पीक सडले. त्यानंतर त्यांनी रब्बीत दादर पेरली होती.
शनिवार, दि.२७ रोजी त्यांनी दादरच्या पिकाची कापणी करून दुपारी दोन वाजता निंबा पाटील शेतातून घरी आले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की, दादरला आग लागली असून, जळत आहे. शेतमालक निंबा पाटीलसह शिवदास पाटील, दिलीप पाटील, दिलीप बिरारी, राजेंद्र पाटील, जितू बोरसे, गणेश पाटील, शेख रौफ आदी मदतीला धावून गेले. दादरच्या कणसासह तोटे (धोंडे) जळून खाक झाले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. एखाद्याने बिडीचा तुकडा न विझवता तसाच फेकून दिला असेल, असा तर्कवितर्क पाहणारे काढत होते.
दोन बिघे शेतात दहा-बारा पोते व चारशेच्या आसपास दादर चाराच्या पेंढ्या (कडबा) असे अंदाजे २० ते २२ हजारांचे उत्पन्न आले असते. शेतीला लागलेला सुरुवातीपासून आतापर्यंतचा सहा-सात हजार रुपये खर्च वाया गेला आणि तोंडी आलेला घासदेखील आगीने हिरावून घेतला. अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडला. तलाठी रजेेेवर असल्याने पंचनामा होऊ शकला नाही.