शेतकऱ्यांना आले-नकोसे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:10+5:302021-09-27T04:19:10+5:30
सातगावसह सार्वे, पिंप्री येथील शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी आल्याची लागवड केली आहे. मागील एक वर्ष सोडले तर अगोदरचे चार-पाच वर्षे आल्याला ...
सातगावसह सार्वे, पिंप्री येथील शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी आल्याची लागवड केली आहे. मागील एक वर्ष सोडले तर अगोदरचे चार-पाच वर्षे आल्याला चांगला भाव होता. मात्र मागीलवर्षी एक हजार ते दीड हजारपर्यंत आल्याचे भाव येऊन ठेपले होते. यावर्षी आल्याचे भाव सुधारतील, या आशेने शेतकऱ्यांनी आल्याची भरपूर लागवड केली. मात्र पावसाच्या जोरदार वर्षावामुळे आले पीक सडल्यात जमा झाले आहे.
आल्याला पाणी धरणारी जमीन अजिबात चालत नाही. जास्त पडणाऱ्या पावसातही हे पीक टिकत नाहीत. त्यामुळे या पिकाच्याही शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. वास्तविक या पिकाला खर्चही खूप होत असतो. महागडी औषधे या पिकाला सोडावी लागतात. आतापर्यंत शेतकऱ्यांचा आल्यावर खूप खर्च झाला आहेत. त्यामुळे कोणते पीक घ्यावे, अशाच चिंतेत सध्या शेतकरी दिसतोय. कापूस सोडला तर कोणत्याच पिकाला हमीभाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांसमोर कोणते पीक लावावे कसे आणि जगावे तरी कसे? असे एक ना अनेक प्रश्न आ वासून आहेत.
प्रतिक्रिया
तीन-चार वर्षे आम्हाला आल्याचे पीक परवडले. मात्र दोन वर्षापासून खर्च खूप उत्पन्न मात्र काहीच नाही. म्हणून यावर्षी शासनाने आले पिकाला मदत करावी.
-भास्कर रामदास डांबरे, शेतकरी, सातगाव डोंगरी, ता. पाचोरा