बंदची कल्पना न दिल्याने शेतकऱ्यांना फेकावा लागला शेकडो क्विंटल भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:01+5:302021-03-13T04:28:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान शहरात जनता कर्फ्यू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान शहरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या कर्फ्यूदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील बंद राहणार आहे. मात्र, याबाबतची कोणतीही सूचना व्यापारी किंवा बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना न दिल्याने शुक्रवारी जिल्हाभरातील शेतकरी आपला माल बाजार समितीमध्ये घेऊन आले होते. मात्र, बाजार समिती बंद असल्याने हा माल कोणीही खरेदी केला नसल्याने संपूर्ण माल शेतकऱ्यांना नाईलाजास्तव फेकून द्यावा लागला. कोणतीही कल्पना न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात बाजार समिती प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले.
जनता कर्फ्यूदरम्यान शहरातील अत्यावश्यक सुविधा सोडून भाजीपाला मार्केट व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने तीन दिवस बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, बाजार समिती प्रशासनाकडून व भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना याबाबतची कोणतीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे शुक्रवारी पहाटे अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणला होता. त्यातच शहरातील भाजीपाला मार्केट बंद राहणार असल्याने किरकोळ विक्रेतेही बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी आले नव्हते. यामुळे जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री करावा तरी कोठे ? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना आधी कळवणे गरजेचे होते, असे सांगत शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
शेकडो क्विंटल भाजीपाल्याचे करायचं काय ?
वराड येथील महेश पाटील या शेतकऱ्याने सांगितले की , गुरुवारी रात्री बाजार समितीने शेतकऱ्यांना कोणतीही सूचना दिली नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे रात्रीच आम्ही माल बाजार समितीमध्ये आणला. तेव्हाही कोणत्याही कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितले नाही की माल आणू नये. त्यानंतर इतर शेतकऱ्यांनीही आपला माल आणून, नेहमीप्रमाणे लिलावाची प्रतीक्षा केली. मात्र, एकही विक्रेता बाजार समितीमध्ये आला नाही. बाजार समितीने आम्हाला आधीच कल्पना दिली असती तर आम्ही या मालाची इतर ठिकाणी विक्री केली असती. बाजार समिती प्रशासनामुळे शेकडो क्विंटल माल आज फेकण्याची वेळ आमच्यावर आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांची वाहने गेटवरच थांबवली
पहाटे जिल्हाभरातून शेतकरी आपला माल बाजार समितीमध्ये आणू लागल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी भाजीपाला मार्केटचे प्रवेशद्वार बंद करून, शेतकऱ्यांची वाहने रस्त्यावरच अडविली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकण्याचा इशारा दिला. यामुळे याठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
व्यापाऱ्यांशी केली चर्चा, अन् शेतकरी फिरले माघारी
यावेळी काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू जाहीर केल्यामुळे शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे भाजीपाला मार्केट बाजार समितीने सुरू ठेवला असता तरीही तो माल खरेदी करण्यासाठी किरकोळ विक्रेते आलेच नसते, असे सांगत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही अनेक शेतकऱ्यांनी व्यापारी व बाजार समिती प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत, बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना आपला माल फेकावा लागण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. किरकोळ खरेदीदार यांनीही पाठ फिरवल्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपला माल परत घेऊन जावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी पाळधी परिसरातील गोशाळेमध्ये आपला संपूर्ण भाजीपाला फेकून दिला.
कोट
बाजार समितीकडून गुरुवारीच परिपत्रक काढून व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनादेखील माल आणू नये, अशा सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना याबाबतच्या सूचना न दिल्याने काही शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणला होता. मात्र, शहरातील किरकोळ विक्रेत्यांनीही या ठिकाणी पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना खरेदीदार मिळाला नाही.
- कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती