१२ दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:39+5:302021-08-12T04:21:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अनियमित मान्सूनमुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. तब्बल बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ...

Farmers have been waiting for rain for 12 days | १२ दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

१२ दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अनियमित मान्सूनमुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. तब्बल बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे, तसेच पावसाचा खंड मोठा राहण्याची शक्यता असून, जिल्ह्यात २० ऑगस्टनंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात जुलै महिन्यात करण्यात आलेली दुबार पेरणीची पिकेदेखील संकटात सापडली आहेत, तसेच सप्टेंबर व ऑगस्टअखेरमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरी या पावसामुळे शेतीला फायदा कमी नुकसानच होण्याची शक्यता राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झाला आहे. त्यात धरणगाव, अमळनेर व चोपडा या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ३० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चोपडा, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता प्रशासनाकडे केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यातच झालेला पाऊस हा काही दिवसांपुरताच असून, पावसाचे खंड मोठे राहत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

२० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता नाहीच?

हवेचा दाब कमी होत असल्याने मान्सूनचे ढग तयार होत नसून, मान्सूनचा खंड वाढत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यातील सर्वांत मोठा खंड आहे. २० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच असून, २० नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उडीद, मूग, सोयाबीनची वाढ खुंटली

जिल्ह्यात ३१ जुलैनंतर पावसाचा खंड सुरू झाला असून, शेतकऱ्यांचा नजरा आता आकाशाकडे केल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीन, उडीद, मुगाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे, तसेच आगामी काही दिवस पाऊस न झाल्यास उडीद व मुगामधील दाणे तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, तसेच बागायती कापसाची स्थिती चांगली असली तरी कोरडवाहू कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक पावसाचा खंड

यावर्षी जिल्ह्यात होणाऱ्या पावसात अनियमितता असून, पावसाचे खंड मोठे राहिले आहेत. जुलै महिन्यातदेखील पहिल्या आठवड्यात आठ दिवसांचा खंड होता, तर काही दिवस दोन ते तीन दिवसांचा खंड पडूनच पाऊस झाला. जून महिन्यातदेखील सुरुवातीला काही दिवस पाऊस झाल्यानंतर काही दिवसांचा ब्रेक घेऊनच पाऊस झाला, तर ऑगस्ट महिन्यात २०१५ नंतर पहिल्यांदाच पाऊस कमी झाला आहे. १ ते ९ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात केवळ २२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कोट..

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडला असून जून, जुलै व ऑगस्ट या तिन्ही महिन्यांमध्ये आधीच खंड राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. हीच स्थिती यंदाच्या मान्सूनमध्ये पाहावयास मिळत आहे. २० ऑगस्टपर्यंत मान्सूनचा खंड कायम राहण्याची शक्यता असून, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

पावसाच्या ब्रेकमुळे खरीप हंगामातील जवजवळ सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. कापसाच्या उत्पादनावरदेखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सोयाबीनला मोठा फटका बसला असून, उडीद व मुगाची स्थितीदेखील काही वेगळी नाही.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक

Web Title: Farmers have been waiting for rain for 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.