अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 11:10 PM2019-09-29T23:10:03+5:302019-09-29T23:10:17+5:30
बिडगाव : मजूर वर्गात घबराट
बिडगाव, ता.चोपडा : येथे रविवारी दुपारी शेतात केळीच्या बागेत ठिबकचा कॉक फिरवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
येथील शेतकरी प्रताप यशवंत पाटील हे दुपारी चार वाजता त्यांच्या इच्छापुर शिवारातील शेतात गेले होते. यावेळी ते केळीच्या बागेत असलेला ठिबकचा कॉक (व्हॉल) बदलवण्यासाठी गेले असता तेथे लपून बसलेल्या अस्वलाने शेतकरी प्रताप पाटील यांच्यावर अचानक हल्ला चढवून डाव्या हाताचे लचके तोडले. काही वेळ झटापट होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने काही मजुरांनी तेथे धाव घेतल्याने चवताळलेल्या अस्वलाने पळ काढला. त्यांना तत्काळ मजुरांनी उपचारासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याबाबत वरगव्हान परिमंडळाचे वनपाल आर.यू.घोडे यांनी घटनेची माहिती घेतली आहे. याबाबत पंचनामा करून पाटील यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे मजूरवर्गात घबराट पसरली असून वनविभागाने तत्काळ उपाययोजना करून चवताळलेल्या अस्वलाचा बंदोस्त करण्याची मागणी होत आहे.