जादा पैसे मिळतील म्हणून हरभरा नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर रात्र जागून काढली

By संजय पाटील | Published: March 1, 2023 11:49 AM2023-03-01T11:49:56+5:302023-03-01T11:52:50+5:30

हरभरा खरेदी नोंदणी, दोन पैसे जास्त मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी केली धडपड

Farmers spent the night awake on the road to register gram to get extra money | जादा पैसे मिळतील म्हणून हरभरा नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर रात्र जागून काढली

जादा पैसे मिळतील म्हणून हरभरा नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर रात्र जागून काढली

googlenewsNext

अमळनेर - बाजार भावापेक्षा शासकीय हरभरा खरेदीत दोन पैसे जास्त मिळतील,  या अपेक्षेने प्रथम नोंदणी करण्यासाठी  तालुक्यातील पन्नास शेतकऱ्यांनी डास आणि गटारीच्या दुर्गंधीची पर्वा  करता शेतकी संघाबाहेरच  रस्त्यावर  मंगळवारची रात्र जागून काढली.  बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळी एका तासात ६०० शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली.

बाजारात हरभऱ्याला ४१०० ते ४२०० रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळतो.  नाफेडच्या शासकीय खरेदीत ५ हजार ३३५ रुपए  भाव जाहीर झाल्याने दोन पैसे जास्त मिळतील आणि तोट्यात जाणारे  शेती  उत्पन्नाची सरासरी साधता येईल या अपेक्षेने नोंदणीची नोटीस जाहीर झाली.  २८ रोजीच शेतकऱ्यांनी शेतकी संघाबाहेर रस्त्यावर गटारीच्या शेजारीच बस्तान  मांडले होते. सुरुवातीला नंबर लावला नाही तर व्यापारी गर्दी करतात किंवा शासकीय खरेदी बंद होते म्हणून शेतकरी एका कागदावर क्रमाने नाव लिहून त्याच ठिकाणी थांबून होते. नंबर मागे पुढे होऊ नये,  म्हणून रात्रभर जागरण केले. डास आणि दुर्गंधीचा विचार न करता  दोन पैसे मिळतील म्हणून त्यांची रात्रभर धडपड सुरू होती. 

शासनाने हेक्टरी साडे तेरा क्विंटल मर्यादा जाहीर केली आहे. सकाळी आठ वाजता नोंदणीला सुरुवात झाली. शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी क्रमवारी टोकन देऊन कागदपत्रे जमा करून घेतली. त्यांनतर कार्यालयात संगणकावर ऑनलाईन नोंदणी केली. १ रोजी सकाळी ८ ते ९ या एका तासाच्या वेळेत तब्बल ६०० शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.

अनेक व्यापारी शेतकऱ्यांकडून स्वस्तात घेतलेल्या मालावर नफा कमवण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या नावावर नंबर लावतात आणि  गरजू शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते म्हणून रात्रभर जागून रांगेत उभे राहण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला - मनोहर पाटील,शेतकरी, गांधली ता.  अमळनेर

Web Title: Farmers spent the night awake on the road to register gram to get extra money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.