तापमानवाढीमुळे केळी बागा संकटात, संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 07:22 PM2018-04-20T19:22:41+5:302018-04-20T19:22:41+5:30
चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगाव आणि परिसरात वाढत्या तापमानामुळे हिरव्यागार केळी बागा संकटात सापडल्या असून त्यांच्या संरक्षणासाठी शेतकºयांची प्रचंड धडपड सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
बिडगाव ता. चोपडा, दि.२० : आग ओकणाºया सूर्यामुळे तापमानाने कहर केला असून चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगावसह परिसरातील केळी बागांवर उष्णतेचे संकट कोसळले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. उष्णतेच्या झळांपासून बचाव करण्यासाठी केळी बागांभोवती साड्या बांधण्यात आल्याचे दृष्य नजरेस पडत आहे.
एप्रिल महिन्यातच तापमान प्रचंड वाढलेले आहे. ‘मे हीट ’ तर अजून बाकी आहे. दिवसागणिक वाढणाºया तापमानामुळे बिडगाव परिसरात केळी बागांना जबरदस्त फटका बसण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी केळीला रात्रीचा दिवस करत पाणी देत असले तरी वाढत्या तापमानामुळे केळीची पाने करपून जळू लागली आहेत. यामुळे शेतकºयांपुढे नवीनच अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.
चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये केळीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात विशेषत: सातपुडा पट्ट्यातील भागात केळी चांगली पिकत असते. तिचे भरघोस उत्पादनही घेतले जाते. चोपडा तालुक्यात सद्यस्थितीत जुनारी पिलबाग व काढणीवर आलेल्या नवती बाग यांचे क्षेत्र जवळजवळ ५ हजार हेक्टरवर आहे. वाढत चाललेल्या तापमानामुळे शेतकºयांच्या संकटात नवीन भर पडली आहे. यात केळीच्या झाडांची पाने कोरडी पडणे, घड निसटून जाणे, पाने करपणे, घडांवर प्रखर सूर्यकिरण पडणे यामुळे घड खराब होऊन काळे पडत आहेत. परिणामी या केळी घडांना व्यापारी कवडीमोल भावातही घेत नाहीत. केळीबाबत नेहमीच शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. वाढत्या उष्णतेसोबतच बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव काही केळी बागांवर झालेला आढळतो. शेतकरी आधीच कमी भावात होणारी केळी खरेदी, तापमानात वाढ या दोन प्रमुख कारणांमुळे संकटात आहे. आता तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. एप्रिल महिना संपायचा आहे. त्यात पुढे मे हिटचा तडाखा येणार असल्यामुळे केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकºयांची धडपड जोरात सुरु आहे. यात अजून भर म्हणजे खालावत चाललेली पाण्याची पातळी होय. यामुळेही शेतकरी अधिकच चिंतेत सापडलेला दिसतो.
केळी वाचवण्यासाठी धडपड
वाढत्या तापमानामुळे केळीला जबर फटका बसत चालला आहे. यामुळे शेतकरी केळी वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी धडपड करतांना दिसत आहेत. यात बांधावर साडी किंवा कपडा लावणे, तुरखाटी, पºहाटी यांचे झापे आडोशे म्हणून बांधणे, घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, हिरवे नेट लावणे, जेणेकरुन उन्हाचा तडाखा कमी प्रमाणात बसेल. काही शेतकरी घडांवर स्प्रे सुद्धा मारत आहेत.