पिकांची तहान भागविण्याची शेतकऱ्यांची कशी-बशी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:07+5:302021-08-14T04:20:07+5:30
नांदेड, ता . धरणगाव : नांदेडसह परिसरात आजपावेतो खरिपाच्या पिकांची तहान भागू शकेल, असा दमदार स्वरूपाचा पाऊसच झाला नसल्यामुळे ...
नांदेड, ता . धरणगाव : नांदेडसह परिसरात आजपावेतो खरिपाच्या पिकांची तहान भागू शकेल, असा दमदार स्वरूपाचा पाऊसच झाला नसल्यामुळे विहिरी बोअरवेलद्वारे कशीबशी पिकांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. जमिनीची
पूर्णतः तहान भागेल असा पाऊस तब्बल दोन महिन्यांपासून अद्यापपावेतो झालाच नसल्यामुळे सर्वदूरपर्यंत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता तर अधूनमधून येणारी पावसाचे शिरवेही बंद झालेे आहेत. पिकांची वाढ खुंटलेली असून, कडक उन्हामुळे लहान लहान पिकं ऊन धरून जळू लागली आहेत. ज्यांच्याजवळ विहीर, बोअरवेल आहे असे शेतकरी पिकांना पाणी देऊन पिकांची तहान भागवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. पण, ज्यांच्याकडे पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही ते शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत.
पावसासाठी नागरिकांनी कुठे महादेवाचा गाभा भरला, तर कुठे नंदीची मिरवणूक काढली, तर कुठे जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढली तरीदेखील पावसाने दडीच मारलेली आहे. शासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीकविम्याचा लाभ देऊन दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. लोकप्रतिनिधींनी देखील शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फोटो ओळी : विहीर वा बोअरवेलच्या पाण्याद्वारे पिकांची तहान भागविण्याचा असा प्रयत्न केला जात आहे. (छाया : राजेंद्र रडे, नांदेड)