शेतकऱ्यांना कापूस बियाणे १ जूननंतरच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:21+5:302021-05-03T04:11:21+5:30
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचा निर्णय : हंगामपूर्व कापसाची लागवड रोखण्यावर भर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचा निर्णय : हंगामपूर्व कापसाची लागवड रोखण्यावर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जिल्ह्यात आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीला सुरुवात केली आहे. हवामान खात्याने या वर्षीही जिल्ह्यात चांगला पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी राजा खुश असून, शेतकऱ्यांनी खरिपासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांना १ जूननंतरच कापूस बियाणे पुरवठा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. हंगामपूर्व कापसाची लागवड झाल्यास, बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही यासाठी कृषी विभागाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात आढळून आला होता. या वर्षाचा खरीप हंगामात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून क्षेत्रीय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कृषी विभागाने सुरू केल्या आहेत. कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडित न झाल्याने पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन हा प्रादुर्भाव वाढू शकतो. यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
बियाणे उपलब्ध झाले नाही तर लागवड होणार कमी
जिल्ह्यात पंधरा ते वीस हजार हेक्टरवर हंगामपूर्व कापसाची लागवड ही होत असते. हंगामपूर्व कापसाची लागवड होऊ नये म्हणून बाजारपेठ एक कापूस लागवडीसाठी बियाणे पुरवठा १ जूननंतरच करण्याबाबत कृषी विभागाने निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशानुसार बियाणे कंपनी, वितरक व किरकोळ विक्रेत्यांनी कृषी विभागाने निश्चित केलेल्या कालमर्यादेच्या आधीच बियाणे विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध केले नाही तर हंगामपूर्व कापसाची लागवड होणे टाळू शकतो, यासाठी कृषी विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
कापूस बियाणे पुरवठा करण्याबाबतचे आदेश
उत्पादक कंपनी ते वितरक - १० मेपासून पुढे
वितरक एक किरकोळ विक्रेता - १५ मेपासून पुढे
किरकोळ विक्रेता ते शेतकरी - १ जूनपासून पुढे
सोयाबीन बियाणांचे भाव वाढण्याची शक्यता
गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र पूर्णपणे वाया गेले होते. अशा परिस्थितीत बाजारात सोयाबीन बियाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र, यंदा सोयाबीन बियाणांच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करता घरचे सोयाबीन बियाणे राखून ठेवावे, असे आवाहन पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केल्यानंतर सोयाबीन हे शेतात उगवलेच नव्हते यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. हा अनुभव लक्षात घेता शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले तर शेतकऱ्यांना काहीअंशी फायदा होऊ शकतो, असाही दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.