आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बाप व भावाने केला गरोदर मुलीवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:10+5:302021-03-20T04:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अडावद / वर्डी / जळगाव : चोपडा तालुक्यातील वर्डी येथील रहिवासी असलेल्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अडावद / वर्डी / जळगाव : चोपडा तालुक्यातील वर्डी येथील रहिवासी असलेल्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व भावाने गरोदर असलेल्या मुलगी व जावई यांच्यावर विळ्याने व हतोडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली. हल्ल्यात दोघांना गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे वर्डी गावात एकच खळबळ उडाली आहे.
चोपडा तालुक्यातील वर्डी येथील किशोर (नाव बदलले आहे) व पूनम (नाव बदलले आहे) या दोघांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरजातीय विवाह केला होता. विवाहानंतर दोघे जवळपास वर्षभर बाहेरगावी राहत होते. एक महिन्यापासून दोघे वर्डी गावात घरी राहायला लागले होते.
दरम्यान, एक वर्षापूर्वी मुलीने आंतरजातीय विवाह केला. या रागापोटी गुरुवारी मुलीचे वडील व भाऊ या दोघांनी जावई यांच्यावर गावाबाहेर एकट्याला गाठून विळ्याने डाव्या हातावर व पाठीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर घरी जाऊन किशोरची पत्नी म्हणजेच पोटची मुलगी पूनमलाही वडील व भावाने विळा व हातोडीने डोक्याला व हाताला गंभीर दुखापत केली.
जळगावात उपचारार्थ हलविले
घटनेनंतर नातेवाइकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दोघांना आणले. त्यांच्यावर डॉ. पंकज पाटील, डॉ. नरेंद्र पाटील यांनी उपचार केले; परंतु दोघेही गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री पती- पत्नीस गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.