पिता-पुत्राने एकाच वेळी केले प्लाझ्मादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:29+5:302021-04-30T04:20:29+5:30
जळगाव : रेडक्रॉस रक्तकेंद्रात बुधवारी पिता-पुत्राने दुसऱ्यांदा प्लाझ्मादान करून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला. एकाच महिन्यात ...
जळगाव : रेडक्रॉस रक्तकेंद्रात बुधवारी पिता-पुत्राने दुसऱ्यांदा प्लाझ्मादान करून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला. एकाच महिन्यात दोघांनीही दोन वेळा प्लाझ्मादान केले आहे.
जळगावातील उद्योगपती आणि ओम योगा ग्रुपचे साधक प्रमोद संचेती आणि त्यांचा मुलगा पारस संचेती यांना मागील दोन महिन्यांपूर्वी कोरोना झाला. कोरोनातून पूर्ण बरे झाल्यावर प्रमोद संचेती यांनी प्लाझ्मादान करण्याची इच्छा रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांच्याकडे व्यक्त केली आणि लगेचच त्यांनी रेडक्रॉस रक्तकेंद्रात येऊन ९ एप्रिल रोजी प्लाझ्मादान केले. वडिलांच्या सेवाकार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्याच दिवशी त्यांचा मुलगा पारस संचेती यांनीही ११ एप्रिल रोजी प्लाझ्मादान केले. एवढेच नाही तर मंगळवार, २८ एप्रिल रोजी पुन्हा एकदा दोन्ही पिता-पुत्रांनी प्लाझ्मादान केले.
कोरोना संसर्गाच्या या वातावरणात सध्या रक्तदानासाठीही नागरिक पुढे येत नाही, अशा परिस्थितीतही या पिता-पुत्राने प्लाझ्मादान करून प्रेरणादायी आदर्श ठेवला.
प्लाझ्मादानात अनोखा आनंद
आपल्या भावना व्यक्त करताना प्रमोद संचेती यांनी सांगितले की, आम्हाला खूप अभिमान वाटतो की, प्लाझ्मादानाच्या या कार्यात आम्ही योगदान देऊ शकलो. पहिल्यांदा प्लाझ्मादान केल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा प्लाझ्मादान करण्यात अजून जास्त आनंद होत आहे. पारस संचेती यांनी सांगितले की, माझ्यामुळे दुसऱ्या कोरोना रुग्णाला जीवनदान देण्याचा आनंद तर आहेच, पण माझ्या वडिलांसोबत प्लाझ्मादान करण्याची संधी मला दुसऱ्यांदा मिळाली, याचा मला खूप आनंद होत आहे.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र कोळी, सुनीता वाघ उपस्थित होते. रेडक्रॉसच्या वतीने सन्मानपत्र देऊन या पिता-पुत्राचा सन्मान करण्यात आला.