शेतातील पिकांचे नुकसान केल्याचा जाब विचारल्याने पिता-पुत्रांवर विळ्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:17 AM2021-01-20T04:17:32+5:302021-01-20T04:17:32+5:30

जळगाव : आमच्या शेतात घोडे चारून पिकांचे नुकसान का केले याचा जाब विचारल्याचे वाईट वाटून चौघांनी अरुण नामदेव कोळी ...

Father and son were attacked for asking about the damage done to the crops in the field | शेतातील पिकांचे नुकसान केल्याचा जाब विचारल्याने पिता-पुत्रांवर विळ्याने वार

शेतातील पिकांचे नुकसान केल्याचा जाब विचारल्याने पिता-पुत्रांवर विळ्याने वार

Next

जळगाव : आमच्या शेतात घोडे चारून पिकांचे नुकसान का केले याचा जाब विचारल्याचे वाईट वाटून चौघांनी अरुण नामदेव कोळी (६०) यांच्यासह जितेंद्र कोळी (२६) व खुशाल कोळी (२१) या पिता-पुत्रांवर भाजीपाला चिरण्याच्या विळ्याने वार केल्याची घटना सोमवारी रात्री ८.४० वाजता पिंप्राळ्यातील मढी चौकात घडली. या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी हल्लेखोर सुपडू चंदू ठाकूर, चंदू ठाकूर, मितेश जाधव, आशाबाई ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण कोळी हे पत्नी शोभाबाई, मुले जितेंद्र व खुशाल यांच्यासह पिंप्राळ्यातील कोळीवाडा येथे वास्तव्यास आहेत. खोटेनगरजवळील वाटिकाश्रमाजवळ त्यांचे शेत आहे. शेती व्यवसाय करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी मढी चौकातील रहिवासी सुपडू ठाकूर याचे तीन घोडे त्यांच्या शेतात चरण्यासाठी येत होते. यामुळे पिकांचे नुकसान होत असल्यामुळे अरुण कोळी व मुलगा जितेंद्र यांनी सुपडू याचे घर गाठून घोडे शेतात चारू नकोस असे सांगितले. त्यावेळी सुपडू याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

घोड्यांना काही केलेस तर जिवंत सोडणार नाही

सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सुपडू ठाकूर याच्या घोड्यांनी कोळी यांच्या शेतात शिरून गहूच्या पिकांचे नुकसान केले. हा प्रकार जितेंद्र याला कळताच, त्याने सुपडूला संपर्क साधून घोडे घेऊन जाण्यास सांगितले, त्यावर त्याने घोड्यांना काही झाले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. रात्री कोळी कुटुंबीय जेवण करीत असताना सुपडू याने जितेंद्रला फोन करून तुमचे घोड्यांबाबतचे दुखणे बंद करून टाकतो, मढी चौकात या असे सांगून त्यांना बोलविले. अरुण कोळी व त्यांची दोन्ही मुले मढी चौकात आल्यानंतर सुपडू व त्याचे वडील चंदू, मित्र मितेश आणि आई आशाबाई त्या ठिकाणी उभे होते.

आज तुझा विषयच संपवितो...

मढी चौकात आल्यावर पिता-पुत्रांना आशाबाई हिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यांची एकदाची कटकट मिटवून टाका अशी ती म्हणताच सुपडू याने भाजीपाला चिरण्याच्या विळ्याने अरुण कोळी यांच्या हातावर वार केला. नंतर जितेंद्र याच्या खांद्यावर वार केला. आज तुझा विषयच संपवितो म्हणत मितेश याने खुशाल याच्या हातावर चॉपरने वार केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत तिघांना पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना रिक्षात बसवून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात नेले.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जखमी पिता-पुत्रांनी उपचार घेतल्यानंतर मंगळवारी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले होते. त्यानंतर जितेंद्र कोळी याने तक्रार दिली. त्यानुसार सुपडू चंदू ठाकूर, चंदू ठाकूर, मितेश जाधव, आशाबाई ठाकूर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Father and son were attacked for asking about the damage done to the crops in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.