मुलाला चांगले उपचार मिळवून देऊ शकत नसल्याच्या नैराश्यातून वडिलांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:32+5:302021-08-27T04:20:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पायाला सेप्टिक झालेल्या मुलाला पैशांअभावी खासगी रुग्णालयात चांगला उपचार मिळवून देऊ शकत नसल्याच्या नैराश्यातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पायाला सेप्टिक झालेल्या मुलाला पैशांअभावी खासगी रुग्णालयात चांगला उपचार मिळवून देऊ शकत नसल्याच्या नैराश्यातून मजूर वडिलांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कानळद्यात सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. अशोक पंडित सोनवणे (४८) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील कानळदा येथे अशोक सोनवणे हे कुटुंबासह वास्तव्यास होते. मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. मुलगा रवींद्र याच्या पायाला सेप्टिक झाल्यामुळे त्यास वारंवार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागत होते. दरम्यान, पुन्हा सेप्टिकचा त्रास उद्भवल्याने रवींद्र यांच्यावर गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यातच आधीच हलाखीची परिस्थिती आणि मुलाला खासगी रुग्णालयात चांगला उपचार मिळवून देऊ शकत नसल्यामुळे वडील अशोक सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. अखेर गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सोनवणे यांनी घरात कुणी नसताना दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रक्षाबंधनानिमित्त घरी आलेली मुलगी अश्विनी व पत्नी हे दोघं बाहेरून घरी आल्यानंतर त्यांना सोनवणे हे गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी जागेवरच मन हेलवणारा आक्रोश केला.
मृतदेह रुग्णालयात हलविला
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी नातेवाइकांसह ग्रामस्थांची त्याठिकाणी गर्दी झाली होती. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला होता. यावेळी नातेवाइकांसह ग्रामस्थांची रुग्णालयात गर्दी झाली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.