वडिलांकडून मिळाले फौजदारी कायद्याचे धडे अॅड.अकील इस्माईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:07 PM2018-12-16T12:07:06+5:302018-12-16T12:07:30+5:30
सुनील पाटील जळगाव : कायद्यात झालेल्या दुरुस्त्या, बदल, गुन्ह्याचे स्वरूप व न्यायालयात पक्षकाराची प्रभावी बाजू मांडण्यासाठी काय तयारी असावी, ...
सुनील पाटील
जळगाव : कायद्यात झालेल्या दुरुस्त्या, बदल, गुन्ह्याचे स्वरूप व न्यायालयात पक्षकाराची प्रभावी बाजू मांडण्यासाठी काय तयारी असावी, कायद्याचा अभ्यास कसा करावा याचे धडे वडिलांकडूनच मिळाले, म्हणूनच आज गाजलेल्या खटल्यांमध्ये काम करणे शक्य होत असल्याचे अॅड.अकिल इस्माईल यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
जळगाव नगरपालिकेच्या घरकुल प्रकरणापासून अधिक चर्चेत आलेले अॅड.अकील इस्माईल यांचे वडील अॅड.एस.एम.इस्माईल हे एकेकाळी जळगावचे नामवंत वकील. वकील, कायद्याचे धडे देणारे प्राध्यापक व धर्मदाय आयुक्त व नंतर पुन्हा वकीली व्यवसाय असा त्यांचा प्रवास. अॅड.एस.एम.इस्माईल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगावात झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले व तेथेच त्यांनी शासकीय विधी महाविद्यालयात वकीलीचे शिक्षण पूर्ण करुन १९४९ मध्ये वकीलीची सनद घेतली. १९५२ पर्यंत तीन वर्ष त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकीली केली. १९५२ ते १९५८ जळगावात वकीली व्यवसाय केला. १९५८ मध्ये धर्मदाय आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कोल्हापुर, नागपूर व मुंबई या मोठ्या शहरात नोकरी केल्यानंतर १९७२ मध्ये धर्मदाय आयुक्त पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९८६ पर्यंत जळगावातील एस.एस.विधी मनियार महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर १९९९ पर्यंत पुन्हा वकीली व्यवसायाकडे वळले. २००६ मध्ये त्यांचे निधन झाले.
एस.एम. इस्माईल यांनी देशात गाजलेले खटले चालविले
एस.एम. इस्माईल यांनी त्यांच्या काळात चोपडा येथील मुन्ना खून खटला, भडगाव तालुक्यातील रोकडा फार्म येथील कन्हैय्या बंधू तसेच जळगावचे सेक्स स्कॅँडल हे तीन गाजलेले खटले चालविले. कन्हैय्या बंधूंच्या खटल्यात तर एक पोलीस अधिकारी व १४ पोलीस आरोपी होते.
अन् मुलाने चालविला वारसा
वडीलांपासून वसा घेऊन मुलगा अॅड.अकील इस्माईल यांनी त्यांचा वारसा पुढे सुरुच ठेवला तो आजही सुरु आहे. अॅड. अकील इस्माईल यांनी १९९० मध्ये वकीलीची सनद घेतली. १९९९ पर्यंत त्यांनी वडीलांसोबत राहून सहाय्यक म्हणून काम केले. त्याच काळात एस.एस.मनियार विधी महाविद्यालय प्राध्यापक म्हणून देखील काम केले. खटला चालवितांना साक्षदारांची उलटतपासणी कशी घ्यावी, वैद्यकिय अधिकाऱ्यांना न्यायालयात कशा पध्दतीने प्रश्न विचारावेत, दोषारोपपत्राच अभ्यास, त्यातील उणिवा, प्रामाणिपणे पक्षकाराची बाजू मांडणे यावर वडीलांनी जास्त भर दिला व त्याचीच माहिती मुलाला सांगितली. वकील व्यवसायापेक्षा प्राध्यापक म्हणून काम करतानाचा आनंद अधिक असल्याचे अकील इस्माईल म्हणतात.
बाललैंगिक अत्याचाराचा कायदा चांगला, मात्र दुरुपयोग नको
गुन्ह्यांचे बदलते स्वरुप व त्यानुसार कायद्यात झालेला बदल याबाबत अॅड.अकिल इस्माईल सांगतात की, महिलांच्या छळासाठी ४९८ कलमान्वये गुन्हा दाखल होतो. पूर्वी या गुन्ह्यात आरोपीला अटक व्हायची. न्यायालयाने केलेल्या निरीक्षणात या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे न्यायालयाने या कलमात अटकेची अट शिथील केली. त्याशिवाय आता थेट गुन्हाही दाखल होत नाही झाला तरी त्यात लगेच अटक होत नाही.
आधी हे प्रकरण महिला सहाय्य कक्षाकडे समुपदेशनासाठी येते. तेथे तडजोड झाली नाही किंवा खरोखरच पतीचा दोष असेल तर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाते. त्याच पध्दतीने अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने बाललैंगिक कायद्यात सुधारणा करुन हा गुन्हा अजामीनपात्र करण्यासह जलदगतीने चालवून न्यायालयातही लवकर शिक्षा लागते. अशा गुन्ह्यांना जरब बसावी या हेतूने कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, त्या योग्यच आहे. काही प्रकरणात वचपा काढण्यासाठी अशा मुलींचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तसेही होता कामा नये.
बलात्काराची तक्रार असेल तर थेट गुन्हा दाखल करायला हरकत नाही, कारण त्यात वैद्यकिय पुराव्याचा आधार असता, मात्र विनयभंग सारख्या प्रकरणात चौकशीअंतीच गुन्हा दाखल व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले.