वडील शेतात, आई घरकाम करीत असताना मुलाने स्वच्छतागृहात घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:31+5:302021-08-14T04:21:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नांद्रा बुद्रुक येथील उमेश दिनेश पाटील (वय : २३) या तरुणाने राहत्या घराच्या स्वच्छतागृहात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नांद्रा बुद्रुक येथील उमेश दिनेश पाटील (वय : २३) या तरुणाने राहत्या घराच्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नांद्रा बुद्रुक येथे उमेश हा वडील दिनेश व आई जयाबाई यांच्यासह वास्तव्यास होता. तो एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तो घरीच होता. त्यामुळे मिळेल ते काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. दरम्यान, दोन दिवसांपासून उमेश हा आजारी होता. शुक्रवारी सकाळी वडील शेतात कामाला निघून गेल्यानंतर आई घरात काम करीत असताना, उमेशने घराच्या स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. फार वेळ होऊनही मुलगा उमेश दिसत नसल्यामुळे आई जयाबाई यांनी मुलाची शोधाशोध सुरू केली. अखेर स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांना मुलगा उमेश हा गळफास घेतलेला दिसून आला. त्यांनी जागेवरच आक्रोश केला. लागलीच गल्लीतील रहिवाशांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर, तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. त्यानंतर, मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता. शवविच्छेदनानंतर सायंकाळी मृतदेह हा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर, या प्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.