बाप नव्हे माणुसकी चिरडली गेली, पित्याच्या मृत्यूनंतर लेकीचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:16 PM2019-06-04T12:16:49+5:302019-06-04T12:17:20+5:30
दुचाकीस्वाराचा पोबारा
जळगाव : सायकलस्वार वृध्दाला उडविल्यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल न करता तेथून पळ काढणाऱ्या सागर त्र्यंबक पाटील (कोळी) व त्याच्या मागे बसलेला स्वप्नील तुषार कोळी (रा.रिधूर, ता. जळगाव) या दुचाकीस्वार तरुणांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. २९ रोजी सकाळी १०.३० वाजता जयप्रकाश नारायण चौक परिसरात झालेल्या या अपघातात हुसेन युसुफ अली (८०, रा.शिवाजी नगर, जळगाव) यांचा मृत्यू झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन युसुफ अली हे २९ रोजी सकाळी साडे दहा वाजता जयप्रकाश नारायण चौकातून सायकलने जात असताना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हुसेन यांना जोरदार धडक दिली. त्यात ते रस्त्याच्याकडेला पडले. या अपघातात दुचाकीस्वारांनी जखमी वृध्दाला दवाखान्यात दाखल करण्याचे सौजन्य न दाखविता तेथून पळ काढला होता. रस्त्याने जाणाºया लोकांनी त्यांना दवाखान्यात दाखल आणले असता त्यांचा मृत्यू झाला होता. हुसेन यांचे नातू मुस्तफा शब्बीर बोहरी (रा.शिवाजी नगर) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात दुचाकीस्वारांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
...तर वडीलांचे प्राण वाचले असते
हुसेन यांना यास्मीन शब्बीर बोहरी ही एकुलती मुलगी आहे. या घटनेवर त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. अपघात कोणाच्या हातात नाही, मात्र जखमींना दाखल करणे हे माणसाच्या हातात आहे. धडक देणाºया दुचाकीस्वारांनी माणुसकी व कर्तव्याला जागून वडीलांना रुग्णालयात दाखल केले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. किंवा परमेश्वराने नाहीच साथ दिली असती तर किमान माणुसकी तरी जिवंत राहिली असती, मात्र यात नेमके उलट झाले. या तरुणांनी माणुसकीचाच जीव घेतल्याची संतापजनक भावना यास्मीन बोहरी यांनी व्यक्त केली.
संशयितांच्या शोधासाठी असा झाला प्रवास
या अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेल्याने त्यांची ओळख निष्पन्न करणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी हे.कॉ.विजयसिंग पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार पाटील यांनी सहकारी विकास महाजन, रतन गीते व तेजस मराठे यांना सोबत घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र त्यात हुसेन जाताना दिसतात तर दुचाकीस्वार स्पष्ट दिसत नाहीत.
या अपघाताच्यावेळी एका तरुणाने ८३१३ इतकाच दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवला होता. त्यावरुन विजयसिंग पाटील यांनी आरटीओ कार्यालय व दुचाकी कंपनीच्या शोरुमध्ये मालकाचा शोध घेतला असता एकाच क्रमांकाच्या तीन दुचाकी निष्पन्न झाल्या. भुसावळ, मुक्ताईनगर व जलचक्र, ता.बोदवड येथील मालकांशी संपर्क करण्यात आला.
जलचक्र येथील दुचाकी हप्ते थकीत झाल्याने फायनान्स कंपनीने जमा केल्याचे निष्पन्न झाले. तेथून ही दुचाकी जळगाव शहरात गोलाणी मार्केटमध्ये वितरीत झाल्याचे निष्पन्न झाले. पुढे तेथून परत रिधूर येथे ही दुचाकी गेलेली होती. ही दुचाकी घेऊन सागर व स्वप्नील हे २९ रोजी शहरात आल्याचे उघड झाले. त्यांना खाकी हिसका दाखविला असता त्यांनी गुन्हा कबुल केला. या गुन्ह्याचा तपास हिंंगोले करीत आहेत.