मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप करणारा पिता अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:23 PM2019-01-31T12:23:18+5:302019-01-31T12:23:40+5:30
अज्ञात वाहनाने मारला कट
जळगाव : मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या श्रीराम उत्तम पाटील (वय ५०, रा. खडके बु.ता.एरंडोल) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोक्याला व छातीला मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. राष्टÑीय महामार्गावर सकाळी साडे अकरा वाजता अपघात झाला नंतर दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, श्रीराम पाटील यांचा लहान मुलगा गणेश याचे १० फेब्रुवारी रोजी उखडवाडी, ता.धरणगाव येथे लग्न आहे. त्यासाठी श्रीराम पाटील हे नातेवाईकांना पत्रिका वाटपासाठी बुधवारी खडके येथून दुचाकीने शहरात आले होते.
राजाराम नगरात भाचा ईश्वर देवाजी पाटील यांना पत्रिका दिल्यानंतर ते अयोध्या नगरात नातेवाईकाकडे गेले. तेथून खेडीकडे जात असताना महामार्गावर हॉटेल गौरव नजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारला.
दोन्ही मुले अभियंता
श्रीराम पाटील हे शेतकरी होते. त्यांचे दिनेश तसेच गणेश हे दोन्ही मुले पुणे येथे अभियंता आहेत. दिनेशचे लग्न झालेले आहे तर गणेश याचे लग्न १० फेब्रुवारी रोजी उखडवाडी, ता.धरणगाव येथे होणार आहे. गणेश नियोजित पत्नी भाग्यश्री ही गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विजूबाई, दोन मुले, भाऊ भगवान पाटील असा परिवार आहे.
दहा फूटापर्यंत गेले फरफटत
या अपघातात श्रीराम पाटील यांना वाहनाने कट मारल्यानंतर साईडपट्टीने दुचाकीसह दहा ते पंधरा फुटापर्यंत फरफटत गेले. साईडपट्टीची किनार डोक्याला व छातीला लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. यावेळी काही लोकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. लग्नपत्रिकेवरील क्रमांकावर संपर्क साधल्याने शहरातील नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविले. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना तेथून दुपारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.