दुरांतो एक्सप्रेसमध्ये मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:04 PM2018-12-25T12:04:49+5:302018-12-25T12:05:50+5:30
जळगाव रेल्वे स्थानकावर प्रचंड गोंधळ
जळगाव : मुंबईहून निघालेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-इलाहाबाद दुरांतो एक्सप्रेसमध्ये दिनेश बालमुकूंद शुक्ला (वय ५२, रा.डोंबिवली, जि.ठाणे, मुळ रा.इलाहाबाद) या प्रवाशाला सोमवारी रात्री १०.१५ वाजता चाळीसगावनजीक ह्दयविकाराचा झटका आला. त्यामुळे छातीत प्रचंड वेदना होत असल्याने मुलाने सहप्रवाशांच्या मदतीने तातडीच्या उपचारासाठी रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी न थांबल्याने शुक्ला यांनी प्राण सोडले व त्यानंतर एक तासाने गाडी जळगाव स्थानकावर थांबविण्यात आली.
दरम्यान, डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू झाल्याने १३ वर्षाच्या मयताच्या पियुश नामक मुलाचा प्रचंड आक्रोश होत होता. त्याची ही स्थिती पाहता अन्य प्रवाशांनाही गहिवरुन आले.शुक्ला यांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करुन प्रवाशांनी जळगाव स्थानकावर ५० मिनिटे गाडी रोखून धरत तिकिट निरीक्षक व स्टेशन मास्तरला जाब विचारला. यावेळी स्टेशनवर प्रचंड गोंधळ झाला होता.
जबाबदारी स्विकारल्यानंतर गाडी रवाना
जळगाव स्थानकावर गाडी आल्यानंतर बराच वेळ शववाहिका आलीच नाही. अर्धा तासाने लोहमार्ग पोलिसांनी शववाहिका उपलब्ध केली. त्यानंतर शुक्ला यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शुक्ला व त्यांचा मुलगा जिल्हा रुग्णालयात लोहमार्ग पोलिसांसोबत असल्याची खात्री पटल्यानंतर प्रवाशांनी गाडी रवाना करण्यास परवानगी दिली. लोहमार्गचे हेडकॉन्स्टेबल मधुकर पारधी व गौतम शेंड्ये यांच्याशी मुलाबाबत बोलणे करुन दिल्यानंतर ११.५७ वाजता गाडी मार्गस्थ झाली. दरम्यान, या घटनेमुळे गाडीतील प्रवाशी व रेल्वे तिकिट निरीक्षक यांच्यात जोरदार वाद झाला. तिकिट निरीक्षक एन.के.तिवारी व ए.स.मीना यांच्यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
आईपाठोपाठ वडीलांनाही मुकला मुलगा
दीनेश शुक्ला यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मुलाने प्रचंड आक्रोश केला. प्रवाशांनी त्याला धीर देत आईशी संपर्क करण्यासाठी माहिती विचारली असता गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये आईचेही निधन झाल्याची माहिती मुलाने दिली. ही माहिती ऐकून प्रवाशांना धक्का बसला. दरम्यान, शुक्ला हे डोंबिवलीत रिक्षा चालक होते. दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. इलाहाबाद येथे जातीचा दाखला घेण्यासाठी शुक्ला रेल्वेने जात होते.
नियंत्रण कक्षाने घेतली नाही दखल
शुक्ला यांना चाळीसगावच्याजवळ छातीत त्रास व्हायला लागला. ही परिस्थिती पाहता त्यांना तत्काळ उपचार मिळावे म्हणून प्रवाशांनी तिकिट निरीक्षकांना सांगितले. त्यांनी भुसावळ नियंत्रण कक्षाला सूचना दिली, मात्र तरी देखील गाडी थांबविण्यात आली नाही. पाचोरा किंवा चाळीसगावला गाडी थांबली असती तर शुक्ला यांचा जीव वाचला असता.