मुलाच्या आजारपणामुळे पित्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:22 PM2019-11-14T12:22:52+5:302019-11-14T12:23:17+5:30
घरात गळफास
जळगाव : प्रचंड पैसा खर्च करुनही मुलावर उपचार करण्यात कमी पडलो आणि अशाही परिस्थितीत मुलगा जगण्याची उभारी देत असताना स्वत:लाच दोषी मानून गणेश भिकमचंद जोशी (४०, रा.सदगुरु नगर, अयोध्या नगर) या तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जोशी हे डाळी व्यवसायात कमिशन एजंट म्हणून काम करायचे. मोठा मुलगा रुद्र याला हृदयाचा आजार आहे. त्याच्या उपचारासाठी जोशी यांनी खूप पैसे खर्च केले, त्यातून कर्जबाजारीही झाले, मात्र तरीही मुलाचा आजार बरा करु शकत नाही हे प्रचंड नैराश्य त्यांना आले होते. अशा परिस्थितीतही मुलगा त्यांना ‘पप्पा होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही काळजी करु नका’ असे सांगून जगण्याला बळ देत होता. लहानशा मुलाला किती समज आहे, आपण का कमी पडतो म्हणून ते सतत नैराश्यात रहात होते. बुधवारी पत्नी पूजा शेजारी गेल्या असताना त्यांनी राहत्या घरात किचनमध्ये पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. लहान मुलगा प्रणव हा घरात आला असता त्याला हे भयावह दृश्य दिसले. त्याने तातडीने आईला ही घटना कळविली.
अत्यंत मनमिळावू स्वभाव
गणेश जोशी अत्यंत मनमिळावू व मदतीला धावून जाणार तरुण होता, असे शेजारील लोकांनी सांगितले. आर्थिक परिस्थितीत जेमतेम होती. कोल्हे यांच्या मालकीच्या भाड्याच्या घरात रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूजा, मुलगा रुद्र, प्रणव, भाऊ शिवा असा परिवार आहे.
रस्त्यात थांबला श्वास
शेजारी राहणारा संकेत राजेंद्र चौधरी या तरुणाने तातडीने घरी धाव घेऊन गणेश यांना खाली उतरवले व शेजारील तरुणांच्या मदतीने तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. रस्त्यात असताना त्यांचा श्वास सुरु होता, मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन होणार आहे.