कोरोनाच्या तिसऱ्या लाटेऐवजी डेंग्यूची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:59+5:302021-07-16T04:12:59+5:30
अमळनेर : शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली असली तरी नाशिक व शिरपूर येथे राहून आलेल्या बालकांना डेंग्यूसदृश ...
अमळनेर : शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली असली तरी नाशिक व शिरपूर येथे राहून आलेल्या बालकांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे आढळून आले आहे. पालिका आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात २९ कंटेनर दूषित आढळले आहेत.
तीन दिवसांपूर्वी शहरातील सोहमनगर व विठ्ठलनगर परिसरात दोन रुग्ण डेंग्यसदृश आढळून आले. ही बालके खासगी दवाखान्यात दाखल आहेत. तेथील डॉक्टरांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांना माहिती कळविली. सोहमनगरमधील बालक नाशिक येथे, तर विठ्ठलनगरमधील बालक शिरपूर येथे पाच- सहा दिवस राहून आले असल्याने तेथे लागण झाल्याचा संशय आहे.
नगर परिषद नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सेवक किशोर माळी, मंगला परदेशी, सरला अहिरे, आरती शिंगारे, पौर्णिमा जोशी, सगुणा बारेला तर आशासेविका वंदना कापडणे, साधना पाटील, भारती पाटील, वंदना पाटील, कविता बोरसे, ज्योती कोळी, सुरेखा पाटील, रेखा पवार, रोहिणी मगरे यांनी सहा गटात पथके तयार करून घरोघरी कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २४२ घरांमधील साधारणतः १००० लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकूण २३ ठिकाणचे पाण्याने भरलेले कंटेनर दूषित आढळून आले.
दूषित कंटेनर आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत ताबडतोब रिकामे करण्यात आले. तसेच सदर परिसरात नगर परिषद स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन परिसरात कीटकनाशक पावडर टाकण्यात आले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी आपल्या घरांमधील पाण्याचे साठे झाकून ठेवावे तसेच घरातील फ्रीज, कूलर, टायर व कुंड्यांमधील साचलेले पाणी साफ करून स्वच्छता ठेवावी, असे आवाहन अध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील व आरोग्य सभापती श्याम पाटील यांनी केले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत सक्तीचे आदेश दिले आहेत. पालकांनी डेंग्यूबाबत देखील काळजी घ्यावी.
- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद.
फोटो ओळी : विठ्ठलनगर व सोहमनगरमध्ये घरांचे व कंटेनरचे सर्वेक्षण करताना आरोग्य कर्मचारी. (छाया : अंबिका फोटो)