भय इथले संपत नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:42+5:302021-03-29T04:10:42+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध स्मशानभूमीत ओट्यांपेक्षा अधिक मृतदेह अंत्यसंस्काला येत असल्याने ...
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध स्मशानभूमीत ओट्यांपेक्षा अधिक मृतदेह अंत्यसंस्काला येत असल्याने नियमित एक किंवा दोन मृतदेह हे खालीच जाळावे लागत असल्याचे अत्यंत गंभीर चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक यात वाढ झाल्याचे स्मशाभूमीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यात नेरी नाका स्मशानभूमीत तर अत्यंत भयावह स्थिती आहे. यात रविवारी दुपारी दीडपर्यंतच चौदा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आलेले होते.
कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढली आहे. यात गेल्या दोनच दिवसात तीस मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोना व्यतिरिक्त होणारे मृत्यूही थांबलेले नसून त्यांचेही प्रमाण अचानक गेल्या दीड महिन्यांपासून वाढत असल्याची माहिती ‘लोकमत प्रतिनिधीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
शिवाजीनगर स्माशनभूमी
गेल्या काही महिन्यांपासून ८ ते १० मृतदेह नियमित येत आहेत. अचानक रात्रीही एखादा मृतदेह येतो, या ठिकाणी ओट्यांची संख्या ही सहा असून रविवारी दोन मृतदेह हे खालीच जळत होते. आधी चार ते पाच मृतदेह दिवसाला यायचे मात्र, ही संख्या वाढल्याचे सांगण्यात आले. दुपारी बारा वाजता दोन ओट्यांवर मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यात आले होते. या ठिकाणी लक्ष्मण हातागडे व त्यांचे कुटुंब सेवा बजावत आहे.
नेरीनाका स्मशानभूमी
मृत्यू झालेल्या कोविड बाधित किंवा संशयितांवर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून जागाच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अंत्यसंस्कारासाठी आधीच ओटे बुक करावे लागतात. त्यानंतरच या ठिकाणी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणावे लागतात. रविवारी दुपारी दीडपर्यंत या ठिकाणी १४ मृतदेह आलेले होते. याठिकाणी विद्युत दाहिनीही असून शनिवारी यात पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दीड महिन्यापासून परिस्थिती बिकट झाली. असून आधी दिवसाला ५-६ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी येत होते. या ठिकाणी धनराज सपकाळे कार्यरत आहेत.
मेहरूण स्मशानभूमी
या ठिकाणीही दिवसाला ८ ते १० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असल्याची माहिती संबधित कर्मचाऱ्यांनी दिली. रात्री या ठिकाणी गंभीर परिस्थिती असते. ओटे सहा असल्याने खालीच अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची माहिती कृष्णा शिरसाळे यांनी दिली.
गेल्या आठ दिवसातील शहरातील कोविडने झालेले मृत्यू
२१ मार्च : ४
२२ मार्च : ५
२३ मार्च : ३
२४ मार्च : ६
२५ मार्च : ३
२६ मार्च : ७
२७ मार्च : ५
तालुकानिहाय मृत्यू
जळगाव : ४५७
भुसावळ : २३२
अमळनेर : १०७
चोपडा : १०५
पाचोरा : ७९
भडगाव : ४७
धरणगाव : ६२
यावल : ७६
एरंडोल : ५२
जामनेर : ७८
रावेर : १०९
पारोळा : २०
चाळीसगाव : ८५
मुक्ताईनगर : ४१
बोदवड : १९