मूल्यमापन सूत्रामुळे बारावीत कमी गुण मिळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:02+5:302021-07-07T04:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे गेल्यावर्षी काही ठिकाणी परीक्षा झाल्या तर काही ठिकाणी परीक्षा देखील झाली नाही. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळाने ठरविलेल्या सुत्रानुसार बारावीचे मूल्यमापन झाल्यास कमी गुण मिळण्याची शक्यता असल्याची भीती बारावीच्या विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली़ त्याबाबतचा निर्णय जाहीर करून महिना उलटला तरी या इयत्तेतील मूल्यमापनाचे सूत्र ठरले नव्हते़ राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे ३०,३०,४० हे सूत्र शनिवारी जाहीर केले. याबाबत विद्यार्थी व पालकांची मते ‘लोकमत’ने जाणून घेतली. त्यामध्ये दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळविले़ पुढे बारावीचे वर्ष महत्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे़ त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.
मूल्यमापनाचे सूत्र
दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या सत्र परीक्षा आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के गुणांचा मूल्यमापनाचा सुत्रात समावेश आहे.
- पालक काय म्हणतात
असे गुण देणे योग्य नाही. परीक्षा होणे आवश्यक होते़ कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. बारावीच्या मूल्यमापनामुळे कमी गुण सुध्दा मिळू शकतील.
- रामचंद्र पाटील, पालक
------
भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये़ आॅफलाइन नव्हे तर आॅनलाइन तरी परीक्षा घेण्यात आली असती तर बरे झाले असते़ विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी झाली होती. त्यामुळे पुन्हा विचार व्हावा.
-ईश्वर चौधरी, पालक
------
- काय म्हणतात विद्यार्थी
अकरावीत असताना बारावीच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देवून अभ्यास केला. त्यामुळे अकरावीतील कमी गुणांमुळे बारावीच्या निकालावर परिणाम होवू शकतो. काही दिवस थांबून बोर्डाने परीक्षा घेणे गरजेचे होते.
- सिध्देश्वर पाटील, विद्यार्थी
-----
कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचेल़ आताही बोर्डाने विचार करून आॅनलाइन व आॅफलाइन दोन्ही पध्दतीने परीक्षा घ्याव्या. त्यातचे प्रोजेक्टचे सुध्दा गुण दिले जाणार आहे. त्यामुळे परीक्षा व प्राजेक्टचे गुणांची सरासरी काढून निकाल देण्यात यावा.
-अनंत धारणे, विद्यार्थी