लवादच्या प्रस्तावावर नगरसेवकांमध्ये पुन्हा पसरली भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:58+5:302021-05-11T04:16:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वॉटर ग्रेस कंपनी व महापालिका प्रशासनादरम्यान असलेल्या वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढता यावा, यासाठी प्रशासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वॉटर ग्रेस कंपनी व महापालिका प्रशासनादरम्यान असलेल्या वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढता यावा, यासाठी प्रशासनाने लवाद नेमण्यावरून सुरू झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर आता नगरसेवकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक नगरसेवकांनी यावर विधीतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला सुरुवात केली आहे, तर महासभेला नगरसेवक गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शहराची दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीसोबत सुरुवातीपासूनच मनपातील नगरसेवक व प्रशासन यांच्यात अनेक वाद निर्माण झाले आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाबाबतदेखील अनेक तक्रारी आतापर्यंत झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी बीएचआर प्रकरणी गुन्हे शाखेने केलेल्या तपासणीत सुनील झंवर यांच्या निवासस्थानी व कार्यालयात काही महत्त्वाची कागदपत्र आढळून आली होती. त्यात झंवर यांच्या साई मार्केटिंग कंपनीला वॉटर ग्रेस कंपनीने उप ठेका दिल्याचेही आढळून आले होते. मात्र, याबाबत मनपा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत वॉटर ग्रेस कंपनीच शहरात सफाईचे काम करीत असल्याचेही आढळून आले होते. याबाबत ॲड. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयात जाण्याचा इशारादेखील दिला आहे. मात्र, याबाबत अजून चौकशी व्हायची असतानाच मनपा प्रशासनाकडून लवाद नेमण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याने व हा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
ठरावाला मंजुरी द्यायची की स्थगिती ? याबाबतही सुरू आहेत चर्चा
ॲड. विजय पाटील यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मनपा प्रशासनाच्या प्रस्तावावर मंजुरी दिल्यास नगरसेवक भविष्यात अडचणीत येऊ शकतात, असा इशारा दिला होता. तसेच याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. नगरसेवकांनी विचार करूनच या प्रस्तावावर मंजुरी द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले. यानंतर मात्र अनेक नगरसेवकांनी सोमवारी या प्रस्तावादरम्यान महासभेत उपस्थित राहावे की विरोध करावा, याबाबत काही विधीतज्ज्ञांशीदेखील चर्चा केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच काही नगरसेवकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून हा ठराव भविष्यात नगरसेवकांच्या अंगलट तर येणार नाही, याबाबत चर्चा केली आहे. त्यातच महासभेला केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने, याबाबत फार माहिती न मिळाल्यास प्रशासनाचा प्रस्ताव स्थगितदेखील ठेवला जाण्याची शक्यता आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्या पार्टी मीटिंगमध्येदेखील चर्चा होणार असल्याची माहिती काही नगरसेवकांनी दिली आहे.
घरकुल प्रकरणानंतर भीती कायम
महापालिकेत झालेल्या घरकुल प्रकरणात दरम्यान काही ठरावांना मंजुरी दिल्यामुळे अनेक नगरसेवक अडचणीत आले होते, तर काही नगरसेवकांना शिक्षादेखील झाली आहे. त्यामुळेच घरकुल प्रकरणाचा परिणाम मनपातील अनेक ठरावांवर होत आहे. अनेक नगरसेवक मनपा प्रशासनाच्या प्रस्तावावर विचार करूनच निर्णय घेत आहेत. आता वॉटर ग्रेस प्रकरणी नगरसेवकांची भूमिका काय राहील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात शिवसेनेने मनपा प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची तयारी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे, तर भाजपची भूमिका अद्याप स्पष्ट झालेले नाही.