रिॲक्शनची भीती वाटत असल्याने लसीकरणासाठी पुढे येण्याचे धाडस होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:09+5:302021-01-23T04:16:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी रोजचे किमान सातशे लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना दिवसाला सरासरी ४५० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी रोजचे किमान सातशे लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना दिवसाला सरासरी ४५० ते ५०० लाभार्थीच लसीकरणाला येत असून अनेक जण रिॲक्शनच्या भीतीमुळे लसीकरणासाठी पुढे येण्याचे धाडसच करीत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ५४३ जणांनी लस घेतली. जिल्ह्यातील डी. बी. जैन रुग्णालयात खासगी डॉक्टरांनी लस घेतल्याने या ठिकाणी पूर्ण शंभर संख्या नोंदविली गेली. जिल्हाभरात शासकीय आरोग्य कर्मचारी आता हळू हळू पुढे येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यात काही ठिकाणी काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रिॲक्शन आल्यामुळे संख्या घटल्याचेही सांगितले जात आहे. लसीबाबत अद्यापही कर्मचाऱ्यांच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण असून ते पुढे येत नसल्याचे चित्र आहे. तर अनेक जण कामांमुळे किंवा बैठकांमुळे लसीकरणाला येऊ शकत नसल्याचेही सांगितले जात आहे. जिल्ह्यात आठड्यातील चार दिवस सात केंद्रांवर ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यात शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६६ जामनेर ६०, चोपडा ७८, चाळीसगाव १००, पारोळा ७८, भुसावळ ६१ जणांनी लस घेतली कोणालाही रिॲक्शन नसल्याची माहिती आहे.
५०० जणांना सरासरी रोज लस दिली जात आहे.
१९०६ जणांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.
३५०० जणांना लस देणे अपेक्षित होते.
रिअॅक्शन काय?
जिल्ह्यातील सात ते आठ कर्मचारी डॉक्टरांना लसीकरणानंतर रिॲक्शन आली आहेत. यात दोन डॉक्टरांना थंडी, ताप, दोन नर्सींगच्या विद्यार्थिनींनाही थंडी तापाचा त्रास झाला होता. दरम्यान, एका आरोग्य सेविकाला अंगावर व्रण, श्वास घ्यायला त्रास झाला होता तर एका परिचारिकेला खोकला व श्वास घेण्याचा त्रास झाला होता. साधारण थंडी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी सौम्य लक्षणे जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लस घेण्यासाठी अडचणी
कार्यालयीन काम असल्याने त्यात व्यस्त होतो, मात्र, पुढच्या टप्प्यात लस घेईल. - लस न घेतलेले कर्मचारी
लस ऐच्छीक आहे बंधनकारक नाही. रिॲक्शनबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. त्यामुळे लस घेतली नाही. - लस न घेतलेले कर्मचारी
काहींना रिॲक्शन येत आहेत. त्यामुळे थोडी मनात भीती आहे. पुढच्या टप्प्यात बघू- लस न घेतलेले कर्मचारी
कोट
अनेक जणांना भीती होती, मात्र, आम्ही स्वत: अशा कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांची समजूत काढून लसीकरण सुरक्षित असल्याचे सांगत असून त्यांचे समुदपदेशन करत आहोत. अनेकांच्या मनातील भीती दूर होऊन आता कर्मचारी समोर येत आहेत. - डॉ. राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी